वावर
औंदा सम्दी कसर काढून टाकू. खत मूत टाकून आंगभर मेनत करु ...पर देनं
फिट्टवून टाकू असं नवरा बायकोनं ठरोलं.. .
..पानी पळला का जोमानं कामाले लागाचं ....वाटपूरचा तुंगा सांगून फनं -पह्याट्या जमा केल्या. जरासी उसनवारी करुन बी बियानं जमोलं . रामरावनं कुटारावर झाकाचे टिन गहान करुन बी बियानं आनलं होतं. मिरुग कोसयला अनं काई उदार तं काई नगद ...असंं करून सरकीची डोबनी केली. अन् वसईच्या गनपतीले औंदा आबादानी हे दे म्हून देवाले साकडं घालू लागला....
नको दिऊ घरदार
ठिऊ फाटक्यात पोरं
ओटी खनानं भरीन
कोंबाकोंबात ऊरजो
साधू दे रहे माही वाही
तुले साकडं घालतो...
वाईच्या गनपती तुले
साकडं घालतो.....
रामरावले लयच हरीक झाला. वाई साधून जाईन मनून समाधानानं भाकर खात
होता.
पन...जसेई कोंबं वरतं मुंडके काळाले लागले तसा पानी कोन्या गावाले गेला
तं पत्ता नाई....आता भलकसी झाली लेक..
ईचारानं भिन हून रामरावनं डोक्स पकळलं..
'करजावाले तं भेवोतेस भेवोतेस.. .पर हे अभाय त्याच्याऊन टवाई करते' ..असंच वाटते राम रवले...! रातभर खटूलीवर कड बदलत राह्यला थो..
झुंजूमुंजू झालं. टायरी वाह्यना पायात घालून लंब्या टांगा टाकत वावरात गेला.
वरचा वरचा पोपळा जरासा ओला दिसे. रामराव माती उखरुन पाहे.. एकट दुकट कोंब डोक्शावर मातीचा पेंड तोलत होता. उली उली जीव पाऊन त्याच्या लेकराची याद आली अन् त्याच्या डोयात टचकन पाणी आलं. पांढऱ्याभक अभायकडं पाऊन थो मने... ' " अभाषा काय मंते रे बाबू..? आता का तू नाई आला तं बरबादीस हाये माह्या जिंदगीची. .कितीक कस काळशीन
राजा ...??? "
डोयापुढं अंधार पळ्लयावानी वाटलं त्याले ..यालेच मंतेत 'फुटकं नसीब..! '..
'नकटीच्या लगनाले सतराशे इघ्न... 'देवानं नसीब देल्ल तवा ढांग नंबरलेच अशीन मी ..
कोड्डया अभायाकडं पाह्यत रामराव पिसं लागल्यावानी बळबळत राये .
तवा हरकी त्याले ढिवसा देत राये.. कायजी नोका करु बापा.. थ्या अंबाबाईचं नाव घ्या.. तिलेच कायची हाये समद्यायची ..देव तारी त्याले कोन मारीन.. ?
'हवं वं थे बी खरंस हाय तुह्य.
उद्या मंगयवार ..चाल अंबामायले न्हानं घालून यिऊ..
हरकी: हवं ना.. आता तिलेच साकळं घालू... !
रामराव: देवपाटातला गनपती थो बी बुडून ठुय पान्यात. देव अदमुसा झाला का
समजीन त्याले.. आपुन कायजीत हाय मून ....
हरकी अन रामरावनं देवीमायले न्हानं घातलं .. अन पाह्यत पाह्यता अभाय
भरुन आलं.
यालेच मते . 'देवाची करनी अन नारयात पानी... '
धो..धो.. बरसात बरसाले लागली. समदीकडं आबादी आबाद झालं.
वावर दरदिसाले हिरवं व्हाले लागलं. घरात कामाची धावपय झाली. औंदा सुगीचे
दिस पाहाले भेटतीन या ईचारानं नवरा बायको सुखावले होते .मनासारकं
समदं व्हाले लागलं होत. अल्लग निंघालेली अवदसा सून तूराटीच्या कुळाच्या भोकातून यायचं सूख पाहे.. तवा तिचा थयथयाट होये .. बुडाबुडीच्या नावानं कडाल बोटं मोळे. .
पह्याटी असी काई तरारून आली का दिठ लागू नय
मून.. हरकीनं काया दो-यात कवळी, बिब्बा, मिरच्या बांधून वावरातल्या बोरीले
ठुनकं बांधल होतं....पह्याटीचं झाडं बोंडायनं वाकून गेल्ते.
रामरावले बक्कळ कापूस झाला. गंजीवर गंजी चढली. घर भरलं भरलं दिसे.
समदीकडं पांढर सोनंच सोनं...
हरके ..तुले औंदा दोन लुगडे घिऊन यिन बजारातून. .कापसाले बेपारी सापळू दे..
धनी तुम्ही माह्यासाठी काई घिऊ नोका.. तुमचं
धोतर दांडावर आलं .. पयले एक धोतर जोडी घिऊन ये जा ... तुमच्या टायरी
चपलीले भोकं पडले..एक नवा जोळ घेजा कापूस ईकल्यावर..
रामराव हिसोब करु लागला.. ..
.. मांगल्या सालचे इठ्याचे पैसे तं पैले द्याचे...
.. चुका-यायचे पैसे... द्याच लागन..
..बियाण्याच्या बदलीतले टिनं सोळून आनाचे..
..हरकीची दवापानी कराचीच कराची...
.. हरकिले लुगडं...असा इचार करतस होता..
तितक्यात 'कापूस भराले टॅक्टर येत हाये.. 'असा गायक्याच्या खंड्यानं निरोप
आनला. अन रामरावले खुशी झाली का त्याले सरग ठेंगना वाटाले लागला ...
दैवानं इतका कस काढला पन तारलई काया मायनचं.
- जयश्री कोटगीरवार
***************
