आम्ही शेतकरी...
आम्ही लहान आहो,
तुम्ही महान आहे.
सांगा कसा जगू मी,
शेती गहाण आहे...
गे माय भू आता या
कंठात प्राण आहे.
भोगून जन्म गेला,
वहिवाट वावराची.
कधी या सुखा न दिसली ही वाट या घराची...
बस एवढे कराना,
वाढीव दाम द्याना..
आम्हा कफल्लकाची,
इतकी तहान आहे...
सांगा कसा जगू मी
शेती गहाण आहे...
आजन्म नांदते ही,
पिंजऱ्यात लोकशाही.
सुकली कधी न अमुच्या, बोटावरील शाई.
उडते विमान तुमचे,
आमच्याच मेहनतीवर.
मग फास का बळीला,
साधा सवाल आहे.
गळफास का बळीला,
इतका सवाल आहे.
सांगा कसा जगू मी,
शेती गहाण आहे...
गे माय भू आता या,
कंठात प्राण आहे. आमच्यामुळेच अमुचा,
भारत महान आहे...
***
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट, जि-वर्धा.
मो. ९२८४१५१७५६

प्रतिसाद (2)
बळीराजाच्या जगण्यातील अत्यंत दाहक वास्तव
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
नरेंद्र भा. गंधारे सरांनी 'आम्ही शेतकरी...' या कवितेतून बळीराजाच्या जगण्यातील अत्यंत दाहक वास्तव आणि त्याची वेदना अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. "सांगा कसा जगू मी, शेती गहाण आहे" ही ओळ प्रत्येक संवेदनशील वाचकाचे मन हेलावून टाकते आणि डोळ्यांत पाणी आणते.
जगाचा पोशिंदा असूनही स्वतःच्या हक्कासाठी आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्याला करावी लागणारी आर्त विनवणी कवीने अत्यंत तरलतेने आणि तरीही धारदार शब्दांत पकडली आहे. कवितेतील लयबद्धता, साधेपणा आणि थेट मनाला भिडणारा आशय या रचनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.
अशा या ज्वलंत आणि हृदयस्पर्शी विषयाला अत्यंत ताकदीने शब्दबद्ध केल्याबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
(विषय दिलेला नाही)
Narendra Gandhare