विश्वस्तरीय कथा लेखन स्पर्धा २०२६ साठी
लेखनाचा विषय : शेती / महिला / ग्रामीण जीवन
शीर्षक :- उद्ध्वस्त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अगदी पहाटेच रोवणीसाठी मजुरायच्या शोधात पडलेल्या पुंडलिकनं घरी परतताच दाराजवळ जोडे काढून ठेवले. बंद केलेली छत्री दारास लटकवली अन् छपरातल्या तकस्पोतावर बसून डोईस बांधलेला शेला काढून गळ्यात टाकला. बाहेर सुरू असलेला रिमझिम पाऊस छत्रीच्या छिद्रांतून गळाल्यानं जरासं ओलसर झालेलं डोकं शेल्यानं पुसलं. हात तकस्पोतावर घट्ट दाबून अन् मान खाली घालून पुंडलिक कुठल्यातरी विचारात गर्क झाला. चेहऱ्यावर कुठल्यातरी चिंतेचे गडद सावट पसरले होते. तशीही चिंता अन् कास्तकारी यांचं नातं इतकं घट्ट असते की जशी एखादी घोरपड कातळास घट्ट बिलगून बसावी.
"आला का रे पुंडलिका?" तकस्पोतावर आडवं झालेल्या बुढ्या धन्यानं हलक्या आवाजात विचारलं. वयाचे पंचाहत्तर पावसाळे बघितलेला बुढा धनी किसन देहानं बराच थकला होता. गेल्या दवात सांजच्यावेळी विठ्ठलाच्या देवळातून हरिपाठ करून परत येतांना पायरीस अडखळून पडला अन् पायाचं हाड मोडून कायम अंथरुणास खिळला. गाववैदूनं खंडू चक्क्याच्या लेप लावला, तेवढाच आराम पडला. पुंडलिक काहीच बोलला नाही. एका हातानं डोकं खाजवत मान खाली करून बसला. डोक्यात शिरलेल्या अनंत विचारांच्या गुंत्यातून तो अजूनही बाहेर पडला नव्हता. कदाचित त्याला या चिंतेव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी गौण वाटत असाव्यात. " काऊन रे बापू, भेटले न्हाई का मजूर?" किसनचा पुन्हा केलेला प्रश्न पुंडलिकच्या अंतरीच्या लाव्ह्यास मोकळा करता झाला. " रस्त्यावर पल्ले हाय का अन्ना मजूर? पाय दुखवत गावभर फिरलं माणूस. या गल्लीतून त्या गल्लीत. पण, एक न्हाई भेटलं लेकाचं. झक मारली अन् ह्या शेतीमातीच्या भानगडीत पल्लो!" लाव्ह्याचा एक तप्त लोट बाहेर पडावं तसं झालं. रेणूनं आणलेला चहा दोघांनाही दिला अन् तकस्पोतास लागून ठेवलेल्या युरियाच्या बोरीवर पदर सावरून तीही बसली.
"अरे का झालं ते तं सांगशीन! ती अडीच एकराची गारगोटी हाये म्हणून तं इथवर भागलं. तीच तं आपली चार पोटं पोसून राह्यली. तिच्यावर राग काहाळून काय भेटन? अन् आमी काई कामं केलीच न्हाई? इथं माणसंच बेईमान झाली तिथं त्या मातीमायचं काय चुकतं! मेहनत कराची लाज वाटते अन् तिलेच तं इकाले लागले लोकं!" किसन दम घेत बोलून गेला. तिथंच खाकरला.
"जिथं गेलो तिथं मजुरायची वानवा. कोणीच खाली न्हाई. शेंबडे पोट्टेही भेटणं मुश्किल झाले. इथं परे टाकून मयना होत आला. परे दीड इत मोठे होऊन गेले. कवा चिखल करीन अन् कवा खामना करीन? आज वाण्याच्या मह्या म्हणे चिखल करून देतो तं कालच रातच्याले सहा शंभऱ्या त्याच्या हाती देल्ल्या. टॅक्टर बी आपल्या सारख्या माणसाले झेपून न्हाई राह्यलं. सहाशे रूपे तास द्या लागते. काई मामुली हाये का? रोवणीची चांगली तीनशे रूपे रोजी देतो म्हणलं तरी साऱ्या मजुरायचे तेच गऱ्हाणे... अमक्याच्या अन् तमक्याच्या बांधीवर चाललो! कास्तकारायच्या जगण्याची तं नुसती मातीच होऊन बसली!" रेणूनं आणून दिल्या चहाचा एकेक घोट बशीतून घेत पुंडलिकनं मन मोकळं केलं.
"भेटन लेकाचे मजूर. जातीन कुठं? एक दीस बाद सही. उद्याले करजो रोवणी. असा वैताग कायले करून घेऊन राह्यला जीवाले? काई उपाशी मरून राह्यलो का आपण? अन् तसंही आज आभाळ गळगळून राह्यलंच! अन् तुम्ही तं तहान लागल्यावर हीर खोदता बेचारे हो. आधीच पाहून ठेवा लागते मजूर. असे भेटते का वख्तावर! इथं तं तीर्थ असते तं भट न्हाई अन् भट हाये तं तीर्थ न्हाई, अशी गत असते!" चहाचा घोट घेत घेत किसन बोलू लागला. काळजी त्याच्याही डोळ्यांतून उमटत होती. पण, एकुलत्या एक पोराच्या जीवाचा घोर आपण नाही तर कोण कमी करणार? शेवटी बापाचं काळीज होतं. त्याचं तं सारं आयुष्यच मातीत खपलं होतं.
"कोणतं वाण टाकलं रे यंदा!" पुंडलिकच्या डोक्यावरचा भार हलका व्हावा म्हणून विषयास कलाटणी देत किसननं बशी खाली ठेवत विचारलं. "का नवीन आणाचं हाये अन्ना? तेच गुदवस्ताचं हलक्या धानाचं लक्ष्मी टाकलं व्हतं. इतभर डगर झालं. गुदवस्ता त्यानंच तं शान राखली. म्हणून तं जमलं!" पुंडलिक उत्तरला.
"म्या काल सांजच्याले नानीले इचारलं व्हतं. ती अन् तिची सून येईन म्हणे. एकांदी अजून भेटली तं पाहू लेकाचं. तुमी अन् म्या हायेच!" चहाचे कप उचलत रेणू बोलून गेली. "यानं खामना होईन. टॅक्टरले हॅरो बांधा लागते. दातारी करा लागते. चिखलात युरिया टाका लागते. फसला तं जोर लावा लागते. हे सारं माह्या एकल्यानं व्हइन का? त्याच दिसी समितीतून युरिया आणतो म्हणलं तं दम घेणं न्हाई होये माह्यानं! घामाजोकर होऊन गेल्तो. कायची बीपी व्हय न कायची न्हाई तं! नुसता जलम चालला ह्या चिखलात." तंबाखूची घोटलेली पुड ओठाखाली दाबत पुंडलिकनं म्हटलं. हात झटकले. रेणूच्या बोलण्यानं मात्र त्यास जरा धीर आला होता. निदान तीन चार बाया तरी खामना कराले मिळाल्या तरी दोन दिसांत आपली रोवणी होऊन जाईल, असा अंदाज त्यानं बांधला.
"अन् आपलं हे बेंड कुठं गेलं. सूर्या निंगून गेला तरी अजून निजूनच हाये! का अजून शिरलं त्या टिन टप्रात? मॅट्रिकले हाये म्हणते अन् असं निजून राहीन तं कोणते दिवे लावन पेपरात?" पुंडलिकनं नेहमीच्या बोलण्यातून मुलाविषयी विचारलं. "का तुमी जवा पाहान तवा लेकराले बेंड - बेंड करत राह्यता. कोणाचं डोक्स फोडते माह्या मंग्या का कोणाची लेक घेऊन पराला? रेडू बी आलटून पालटून नवं रेकॉर्ड लावते. तुमची तं एकच कॅसेट घासू घासू चालते!" रेणू तावातावानं बोलून गेली.
"अवं तं एवढी ताव खाऊन राह्यली मायमाजे. माह्य पोरगं... माह्य पोरगं म्हणून तं त्याले डोकस्यावर बसून ठेवलं तुनं. तुह्य पोरगं अन् माह्या का दुस्मन व्हय ? त्याच्या एवडाले पोरं पाह्य कसे रोवणीले जाऊन राह्यले. तीनशे रूपे रोज पाळून राह्यले अन् ह्या पाय कसा त्या टिन टप्रात घुसून राह्यते! का पाह्यते न का न्हाई देव जाणे!" तकस्पोतावरून उठत पुंडलिकनं म्हटलं अन् न्हाणीत निघून गेला.
"एक दिस तं भेटते त्याले आराम कराले. न्हाई तं रोज दोन कोसावर शाळेत जाचं... अभ्यास कराचा... धा वाजून जाते लेकराले निजाले अन् यंदा तं मॅट्रिकच वरीस हाये बिचाऱ्याचं. अज इतवार हाये तं निजला बिचारा खोलीत. नका जुपू त्याले यंदाच्या साली वावरात. पास व्हइन तं शयरात धाडू त्याले. शिकन जरासा तं लागन कुठं नवकरीवर. आपल्या सारखं चिखलात तं न्हाई खपा लागन!" तकस्पोतावरच्या चादरीची घडी करत रेणू बोलून गेली. घराचं अन् दाराचं सावरता सावरता अर्ध आयुष्य सरलं तरी रेणूनं कुठली कुरबूर केल्याचं पुंडलिकच्या ऐकिवात नाही.
"अवं तं मायमाजे, काम केल्यानं कुठं माणूस मरते का? आज उद्या त्याचंच वावर व्हईन. मंग जावंच लागन नं! कष्ट तं कास्तकारायच्या पाचवीलेच पुंजले हायेत. मीनं न्हाई वाह्यले भारे ! जी खोड बाळा, तीच जन्मकळा राह्यते. म्हणून आताच वझं टाकलं डोईवर तं बरं राह्यते. अन् नवकरी करन तरी वावर राहीनच न! " न्हाणीत अंगावर पाणी घेत पुंडलिक बोलला अन् रेणूच्या अंगाचा तिळपापड झाला.
" एवडुश्या कामासाठी कायले मरन गिरन काळून राह्यले तं कोण जाणे! तरी बरं झालं खंडीभर लेकरं न्हाई!" रेणू वाळलं सरपण काढतांना तावातावात बोलून गेली अन् आपल्या स्वयंपाकाला लागली. चुलीतला धूर साऱ्या घरभर पसरला तसा मंगेश आतून डोळे चोळत बाहेर आला. "चालतं का रे मंग्या अजच्या दिस रोवणीले? मजूर न्हाई भेटले लेका. येशीन तं दोन दिसात होऊन जाईन गारगोटी लावून. मलेही हात आसरा होऊन जाईन." टॉवेलनं अंग पुसता पुसता पुंडलिकनं विचारलं. बापाच्या काळजातली चिंता कधी नव्हे ती मंगेशनं जाणली असावी. शेवटी कास्तकाराचं पोर ते! शिक्षणासाठी पुढल्या वर्षी त्यालाही गाव सोडून बाहेर जावं लागणारच होतं. "आजच्या दिवस येईल बा! उद्या शाळा आहे. सुट्टी नाही मारणार! मला चांगल्या गुणांनी पास व्हायचं! पुढल्या वर्षी शहरात धाडशील ना!" डोळ्यावर पाणी मारत मंगेशनं म्हटलं अन् पुंडलिकच्या अंगावर मणभर मांस चढल्यासारखं झालं.
" आरं हे सारं तुयासाठी न्हाई तं कोणासाठी करून राह्यलो? जा जो पुडल्या साली शयरात. पर, आज तं वावरात चाल. कर मंग लौकर लौकर! धानाच्या जुड्याच फेकजो बांध्यात. मी व्हतो म्होयरं. तो मह्या येतो म्हणे धा वाजेस्तोवर. तू येशीन तं सायकलवर ह्या युरियाच्या बोऱ्या घेऊन येजो!" इति पुंडलिक. "दे वं दोन घास झाले असतीन तं खाले!" पुंडलिकनं रेणूस म्हटलं तसा आतून आवाज आला," ताट वाडलंच हाये. येऊन बसा पाटावर!" मघाशी शेती नावानं बोटं मोडणारा पुंडलिक मात्र ज्या मातीनं आपल्या पोटाची सोय केली तिला आधी घास दिल्याबिगर जेवायचा नाही. ताटापुढं घास ठेवून पाणी ओवाळलं. नमस्कार केला. काय बोलला कुणास ठाऊक! पुंडलिकनं दोन घास घाईघाईतच खालले. अंगात सदरा घातला. डोईस शेला गुंडाळून दारावरची छत्री घेतली. जोड्यातली माती झटकून पायात जोडा घातला अन् त्यानं वावराची वाट धरली. पाऊस रिमझिम असला तरी आभाळ मात्र आपला नगारा अधून मधून वाजवत होतं. जणू काही वाजत गाजत पुंडलिकच्या वावरातली रोवणी होऊ देण्याचा त्याचा बेत असावा. रेणूनं आपलं घरातलं आवरलं. रोवणी करतांना द्यासाठी चण्याची उसळ घेतली. अंगावर पांघरायचा मेनकापड घेतला. बुढ्या धन्यास पाण्याचं भांडं भरून आणून दिलं. शेजारी ठेवलेल्या स्टूलवर त्याच्या जेवणाचं साहित्य झाकून ठेवलं. नेहमीप्रमाणे " मामंजी जेवून घेजा!" असं म्हणत तिघाही जणांची शिदोरी बांधली. घरापुढच्या नानीले आवाज देत वावराचा रस्ता धरला. दहावीत जरी असला तरी अंगापायानं धडधाकट असलेला मंगेश सायकलवर एक मागं अन् एक मधात अशा दोन बोऱ्या घालून आपला मागं मागं निघाला.
अकरा जास्तच झाले असले तरी आभाळ असल्यानं वेळ समजू येत नव्हती. महेंद्रच्या ट्रॅक्टरनं आधीच जागा फोडली होती. वरचा पाणी असला तरी बांध्यात पाणी टाकून ट्रॅक्टरच्या हॅरोनं चिखल केला गेला. आलेल्या बाया मजूराय संग रेणूनं आपले कामाचे कपडे चढवले. त्यावर मेनकापड बांधला अन् बांध्यात उतरली. नानीनं सुनंसोबत अजून एका बाईस आणलं होतं. मंगेश अगोदरच बांधलेल्या रोपायच्या जुड्या चिखलात आणून टाकू लागला. वयाची साठी ओलांडल्या नानीनं लुगडं वर खोचलं अन् झुलवे म्हणण्यास सुरुवात केली तशी तिची सून आपला सूर मिसळवू लागली. पुंडलिकच्या मनात साचलेली मरगळ अन् चिंतेचा धूर सरून नवी उर्मी जागली होती. पऱ्ह्याच्या जुड्या फेकतांना त्याच्याही ओठी शिवारचं गाणं फुलू लागलं होतं. सकाळी नको ही शेतीमाती म्हणणारा पुंडलिक दिमाखात अंगावर चिखल मिरवत होता. बांध्यात उतरलेले अन् बांध्यावर उभे असलेले सारेच चिखलाच्या होळीत रंगले होते. महेंद्र आपला ट्रॅक्टरच्या स्टिअरिंगमध्येच गुंतला होता. पुंडलिकची बांधी निपटवून त्यास कोमटयाच्या शेतात जायचं होतं. हेच तर दिवसं आहेत, ज्यात त्याची कमाई असते. दोन अडीच तास रोवणी चालली अन् आभाळ अधिकच भरून आलं. खंडोबाला हळदीचा भंडारा उधळतात तसं आभाळ सगळीकडं बुक्का उधळल्यागत काळंभोर झालं. सूर्या तर कधीचाच हरवला होता. विजांचा कडकडाट वाढला. पावसाला मात्र तेवढा जोर नव्हता. गणपतीत देवळाच्या भोवती लावलेल्या विद्युत दिव्याच्या माळा चमकाव्या तशा सौदामिनी आभाळभर चमकत होत्या.
" बापू मंग्या! तू जा मा त्या झोपडीकड. इजा चमकून राह्यल्या. आधीच तू पायाळू. आमी येतो बातच जेवाले तिकळं!" रेणू मंगेशच्या हातच्या जुड्या घेत म्हणाली. तसा तो भरलेले हात झटकत निघून गेला. "जेवून घे वं नानी ! ऐ sss मंग्यांची माय. जेवून घ्या सारे जण. म्या येतो बाकीच्या जुड्या बांधावर ठेवून. दोन वाजून राह्यले!" मधल्या बांधीवरून पुंडलिकनं आवाज दिला तसा ट्रॅक्टर थांबला. मजूर थांबले अन् पळसाच्या झाडाजवळ असलेल्या झोपडीकडं निघाले. या पळसाच्या झाडाखाली पुंडलिकचा आजा गजानन पुरला म्हणे. म्हणून हा पळस तसाच राहिला. रेणू अन् मजुरांयनं अंगावरचे ओले मेनकापड उतरवले. त्यावरचा चिखल साफ केला. नानीच्या सुनेनं आणलेल्या विहिरीतल्या पाण्यानं सर्वांनी हातपाय धुतले. आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. महेंद्रनं शिदोरी आणली नव्हती. झोप झाली नसल्यानं भूक नाही म्हणून जरासा झोपडीतच पडला. इतरांनी आग्रह केला तरी त्यानं मात्र काहीही खाण्यास नकार दिला. रेणूनं नवऱ्याची शिदोरी वेगळी काढून ठेवली अन् पोळीचा एक घास तोंडात भरावा, इतक्यात आभाळानं कडाडलं. निसर्ग कोपला. काळाच्या काळोख्या गिधाडानं आपले भयाण पंख पसरवून झडप घातली. आतापर्यंत आसपास पडणाऱ्या वीजांनी कानशिलं फाटण्याची वेळ येत होती. तीच वीज झोपडीस लागून असलेल्या पळसाच्या झाडाजवळ पडली. क्षणार्धात एखाद्या देशानं दुसऱ्या देशावर अणुबाँब टाकावा असा लख्ख उजेडाचा लोळ उठला. झोपडीला जाळून आत शिरलेल्या विजेनं दोन घास सुखानं खाणाऱ्या जीवांचा घास घेतला. झोपडीत शिदोरी खाण्यास बसलेले पाच अन् निजलेला एक अशा सहाही जीवावर काळाचा घाला पडला अन् काही कळायच्या आत त्यांच्या किंकाळ्या विजेच्या कडकडाटात मिसळल्या. प्रकाशाच्या लख्ख झोतानं पुंडलिकचे डोळे दिपले. वीज कुठे पडली... ? काय घडलं... ? त्यास काहीच कळलं नाही. एकीकडे सहा हृदयं बंद पडली तर दुसरीकडे एका हृदयाची धडधड वाढली होती. बराचवेळ कानावर हात ठेवून बांधीवरच बसलेल्या पुंडलिकनं कानावरचे हात काढले. कानं अगदी बधीर झाले होते. भुंगा कानात शिरल्यागत आवाज येत होता. डोळ्यांपुढं अंधारी दाटली होती. जसं डोळ्यांत अंधाराचं सावट पसरलं असावं. पुंडलिक क्षणभर मान खाली घालून बसला अन् कुठल्यातरी काळजीनं... कसल्यातरी घोरानं लगेच स्वतःला सावरत उठला.
" रेणू sss... ऐ मंग्याची माय sss!" त्यानं तिथूनच हिंमत करून आवाज देऊन पाहिला. कलेवर कुठं बोलत असतं! क्षणापूर्वी सारं रान गुंजलं... कदाचित गावही बहिरं झालं असेल असा आवाज आणि आता मात्र एक भयाण शांतता! पुंडलिक तसाच झोपडीकडं निघाला. चिखलानं पाय जखडले असले तरी, पायाला चाकं लावल्यागत चालू लागला. झोपडीच्या दाराशी आला आणि समोरचं काळालाही पाझर फोडेल असं करुण दृश्य पाहून साऱ्या आसमंताला बहिरं करणारा टाहो त्याच्या कंठातून फुटला. सहस्त्र फण्यांनी भुजंगानं दंश करावा, अशा असह्य वेदनांनी त्याला घायाळ केलं. " मंग्या sss! रेणू sss! हे देवा, हे काय झालं रेsss?" कुठलीही भीती मनात न ठेवता तो सरळ निपचित पडल्या कलेवरांजवळ आला. मंगेशच्या निष्प्राण देहाला बिलगून त्यानं शोकाच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या. स्वकष्टानं सुखाचं स्वप्न फुलवू पाहणाऱ्या कुटुंबावर आभाळ कोसळावं तसं झालं. सोडलेल्या शिदोऱ्या तशाच उघड्या होत्या. पळसाच्या झाडातून अन् मोडक्या छताच्या झोपडीतून अजूनही धूर निघत होता. मंग्याच्या ओठातला घास ओठातच राहिला. पोटात दोन घास जावे, हे कदाचित काळालाही मान्य नव्हते. गरिबांच्या पोटाला जन्मापासून चिकटलेली भूक तशीच त्यांच्यासोबत घट्ट बिलगून गेली होती. थोड्यावेळापूर्वी गाणं म्हणणारी नानीची सून अन् झुलवा गाणारी नानी उघड्या डोळ्यांनी निपचित पडली होती. झोप झाली नाही म्हणून जरासा पडलेला महेंद्र पुन्हा कधी उठणारच नव्हता. सारे कसे अबोल झाले असले तरी, पुंडलिकचा टाहो आसमंत भेदून जात होता... त्याला सकाळी म्हटलेले स्वतःचेच बोल आठवू लागले..." काम केल्यानं कोणी मरतं का?" मात्र, निसर्गाच्या क्रौर्यानं त्याच्या कुटुंबावरच नव्हे तर जगण्यावरच झडप घातली होती... निसर्गात राबणाऱ्या पुंडलिकाचं अख्ख आयुष्य निसर्गाच्या क्रौर्यानं उद्ध्वस्त झालं होतं...विजांचा कडकडाट अन् पाऊस अजून सुरूच होता. नभातला अन् पुंडलिकच्या डोळ्यांतलाही... कदाचित न थांबण्यासाठीच...
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
लीलाधर रामेश्वर दवंडे
जिल्हा परिषद शाळेजवळ
मुक्काम पोस्ट : आजनी ( रडके )
तालुका: कामठी, जिल्हा : नागपूर
मुख्य पोस्ट : कन्हान पिंपरी ४४१४०१
व्हॉट्स ॲप क्रमांक: ८४१२८७७२२०
सत्यापन
आदरणीय महोदय,
सदर स्पर्धेसाठी मी पाठवत असलेली "उध्वस्त" ही कथा स्वलिखित आहे. यात कुठलेही चौर्यकर्म नसून पूर्वप्रकाशित नाही. तसे आढळल्यास, मी दंडास पात्र असेल.
लीलाधर रामेश्वर दवंडे
बुधवार दिनांक : १८/११/२०२६

प्रतिसाद (1)
काळजाचा ठोका चुकवणारी
डॉ. मीरा पंडित
लीलाधरजी, काळजाचा ठोका चुकवणारी आणि अंगावर शहारे आणणारी अप्रतिम कथा! कथेच्या पूर्वार्धात तुम्ही उभी केलेली शेतकऱ्याची जिद्द, वऱ्हाडी बोलीतील जिव्हाळा आणि रोवणीचा आनंद इतका जिवंत वाटतो की वाचक त्या वातावरणात पूर्णपणे एकरूप होतो. आणि उत्तरार्धात अचानक कोसळलेला निसर्गाचा प्रकोप वाचताना मन सुन्न होऊन जाते. "एकिकडे सहा हृदयं बंद पडली तर दुसरीकडे एका हृदयाची धडधड वाढली होती" किंवा "गरिबांच्या पोटाला जन्मापासून चिकटलेली भूक तशीच त्यांच्यासोबत घट्ट बिलगून गेली" यांसारखी वाक्ये वाचकांच्या काळजाला थेट चटका लावून जातात. 'उद्ध्वस्त' हे शीर्षक कथेच्या शेवटच्या क्षणी संपूर्ण ताकदीने समोर येते. शेतकरी जीवनाचे वास्तव आणि निसर्गाच्या लहरीपणाचे भीषण रूप मांडणारी ही एक अविस्मरणीय आणि अत्यंत ताकदीची साहित्यकृती आहे. तुमच्या लेखणीला मनापासून सलाम!