झुंज
मोडीला असा अर्ध्यात जरी डाव तुम्ही
उरलेली बाजी मी मातर खेळणार हाय,
झुंजलात भर ज्वानीत मरणाशी तुम्ही
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
रातीच्या अंधारात जर चिमणी विझली
बंद दाराआड बी मनात भीती रुजली,
भूत बीत चोर बीर काई नसतंय म्हणत
लेकराईला घट्ट आवळून झोपणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
गोठ्यातली गुरं जरी हंबरू हंबरू पुसली
धन्याची हसरी काया काऊन नाई दिसली,
बाजारा गेला अन घराला इसरला म्हणत
आसवं पुसून लटकंच रागावणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
नांगरणी वखरणी कापणी समदं करीन
काळ्या शिवारी बैलासंग बैलावानी राबीन,
दुष्काळ हामच्या पाचवीलाच पूजला म्हणत
वावराची दुबार पेरणी पण करणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
पोरा पोरीचं शिक्षण लगीन समदं करीन
मायच्या दवेखान्यासाठी पय पय जुळविन,
माझ्याशिवाय आता कोण करणार म्हणत
घरावरची खापरं बी मीच फेरणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
दिवाळीत पोरं रुसतील का कापडासाठी
हट्ट करून बसतील का गोड जेवणासाठी,
मनाच्या वाकळीला संयमाचं ठिगळ लावत
ईचाराच्या इंगळीची इजा सोसणार हाय...
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
बारा गावचं प्यायली पाणी जरी लेकरं
शिकूनसनी झाली लई शानी जरी लेकरं,
आत्महत्या पाप असती पोरांनो म्हणत
आयुष्याचा धडा त्यांना शिकविणार हाय..
धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय
- Read more about झुंज
- 1 comment
- Log in or register to post comments
- 12 views

प्रतिसाद (1)
अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना! पतीच्या अकाली निधनानंतरही खचून न जाता, आपल्या कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी जिद्दीने उभ्या राहणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीच्या अदम्य इच्छाशक्तीचे या कवितेत अत्यंत प्रभावी दर्शन घडते.
अस्सल मातीचा सुगंध असलेली ग्रामीण बोलीभाषा आणि 'धनी मी मातर जगण्याशी झुंजणार हाय' ही काळजाचा ठाव घेणारी ओळ या कवितेचा खरा आत्मा आहे. रात्रीच्या अंधारातील भीतीवर मात करणे असो, गोठ्यातील मुक्या जनावरांची लटक्या रागाने समजूत घालणे असो, किंवा दुष्काळाच्या संकटातही दुबार पेरणी करण्याचे धैर्य असो; या प्रत्येक कडव्यातून कवीने एका सोशिक पण तितक्याच खंबीर स्त्रीचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.
कवितेतील 'मनाच्या वाकळीला संयमाचं ठिगळ लावत' यांसारख्या उपमा थेट मनाला स्पर्श करतात आणि कवीच्या संवेदनशील प्रतिभेची साक्ष देतात. शेवटच्या कडव्यातून दिलेला 'आत्महत्या हे पाप असून संकटाशी लढूनच जगायचे असते' हा संदेश संपूर्ण समाजाला जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देणारा आहे. या अत्यंत जिवंत, संवेदनशील आणि प्रेरणादायी कलाकृतीबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतुक!