दुःखात राहतो मी
पेरून कष्ट सारे शेतात राबतो मी
रक्तास आटवूनी पोटास पाळतो मी
आई समान शेती आभाळ बाप माझा
आजन्म पोसणाऱ्या नात्यास जागतो मी
ओतून प्रेम सारे मातीत पेरले बी
बीजास कोंब येता हर्षात नाचतो मी
वाढून पीक आले डोळ्यात तोष पाणी
बाळा समान माझ्या मालास मानतो मी
फेडेन कर्ज सारे येती सुखे जराशी
हाती असेल पैसा स्वप्नात रंगतो मी
हातात धान्य आले नेता विकावया ही
चेष्टा असे नशीबी दुःखात राहतो मी
ही रोज रोज हत्या माझीच होत आहे
कष्टात आटलेल्या रक्तात नाहतो मी
हे स्वप्न तेच होते जे भंगले सदाही
देऊळ तेच आहे देवास शोधतो मी
डॉ. गिरिधर शं. काचोळे,
हिंगणघाट
मो.नंबर - ९७६५०३८६२४
