सोशल मीडियावर आपण नेहमी उपासमारी, कुपोषण, गरिबी, दारिद्र्याची छायाचित्रे पाहून हळहळ व्यक्त करतो. हळहळ व्यक्त करणाऱ्यांकडे तसही दुसरा काही उपाय सुद्धा नसतोच त्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करतात. परंतु या विषयाच्या खोलात जाऊन कारणे आणि उपाय शोधण्याची मानसिकता बहुतेक वेळा कोणाचीच नसते. मुंबई पुणे सारख्या महानगरातील झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या ही मूळची दुष्काळग्रस्त भागातील आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला तर आढळून आले की त्यांचे पूर्वज अल्पभूधारक किंवा जिरायती जमिनीचे शेतकरी होते. रोज सकाळी शहरात मजूर अड्ड्यावर दिसणारे लोक हे सुद्धा मूळचे व्यवसायाने शेतकरीच.