देवा गरीबाच्या घरी ..... कवा कवा येत जा....

shrikant dhote's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
गीतरचना

काव्यप्रकार: कविता
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,
नसली पुरणपोळी तरी, चटणीभाकर खात जा .......

हातावर आणून देवा, पानावर खाण,
अस झाल देवा इथ, कष्टकर्याच जिण,
इचार येते मनात कसा, साजरा करू सण,
तरी देवा निवदाचा, भात तु खात जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

नाही यग्ययाग देवा, नाही देत कुणा दान रे ,
भिकही मागत नाही, मागत नाही वरदान रे,
नको खोटी शान देवा, नको नुसता मान रे,
फक्त लढण्यासाठी देवा, पाठीवर थाप तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा......

धनिकांच्या चढल्या इथे, मोठमोठ्या माड्या,
कष्टात मेल्या देवा, आमच्या किती पिढ्या,
गरीबांच्या देवा ओस पडल्या रे झोपड्या,
पण या झोपडीची देवा, आस तु करत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

हाती माळ घेवोनिया, जपत नाही नाम रे,
कष्ट करतो आम्ही इथे, गाळतो घाम रे,
त्या घामाचही आम्हा, मिळत नाही दाम रे,
पण पोटच्या भाकरीसाठी, काम तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

सांग कसा झाला देवा, माणुस माणसाचा वैरी,
माणसामाणसात कशी वाढत चालली दुरी,
अशा वेळी सांग देवा, कोण आम्हा तारी,
म्हणुन देवा जगाचा हा, भेद तु मिटवित जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

प्रतिक्रिया

Ravindra Kamthe's picture

नमस्कार,

श्रीकांतजी फारच छान आहे ही रचना.

रविंद्र कामठे

आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com

Raj Pathan's picture

अतिशय उत्कृष्ठ रचना भावा.

धन्यवाद

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!