नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

आम्ही जगायचं कसं (कविता)

Nilesh's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

आम्ही जगायचं कसं... (कविता)

भाजीपाला विकत घेतांना
भाव कमी करायला लावणा-या साहेबांना
शेतकरी म्हणाला,
"साहेब तुम्हीच सांगा...
आम्ही जगायचं कसं?"
तुम्हाला पगार मिळतो...
मिळायलाच पाहिजे
तुम्ही जाॅब करता...
तुमचे प्रमोशन होते...
महागाई वाढली की महागाई भत्ता वाढतो...
राहण्यासाठी घरभाडं मिळतं...
ऐवढेच काय
पायी चालून तुमचे पाय दुखू नये म्हणून
तुम्हाला वाहन भत्ता ही मिळतो...
वेतन आयोगासाठी
तुम्हाला संपही करता येतो...
साहेब तुमच्या बुद्धीवर
जास्त ताण पडू नये म्हणून
तुम्हाला मिळतात हक्काच्या पगारी रजा...
साहेब समजून घ्या... आमचं जीणं!
शेतक-याला निसर्ग कुठलाही
महागाई भत्ता देत नाही...
कोणतंच वावर
आम्हाला पगारही देत नाही...
आम्हाला नसतात आराम करण्यासाठी
तुमच्या सारख्या हक्काच्या पगारी रजा!
साहेब आम्ही तरीही राबतो
कोणतीच हमी नसताना...
पेरतो दरवर्षी वावर
दुष्काळ असो वा पूर
खेळावाच लागतो
आम्हाला जगण्यासाठीचा जुगार...
निसर्गाच्या मर्जीवरच चालतं आमचं सारं...
साहेब तुम्हीच तुमचा पगार वाढवून
जगणं महाग करता...
आणि म्हणता महागाई वाढली...
साहेब तुम्हांला घरात चालतात
महाग चैनीच्या वस्तू
फक्त चालत नाही महाग भाजीपाला....
साहेब तुम्हाला कधी कळणार
भाजीपाल्याचा दर वाढवून
आम्ही नफा कमवत नाही...
साहेब आम्ही शेतकरी आहोत...
व्यापारी नव्हे...
आमचा शेतकरी धर्म
म्हणून आम्ही मागतो
केवळ आमच्या श्रमाचे मूल्य!
साहेब आम्हाला
आमच्या कष्टाचं फळ
नाही मिळालं तर
तुम्हीच सांगा
आम्ही जगायचं कसं?"

........ निलेश कवडे अकोला
Mb. No. 9822367706

Share

प्रतिक्रिया