Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



जय विदर्भ?

जय विदर्भ?

सुमारे आठदहा वर्षांपूर्वीची घटना आहे. आकोट (जि. अकोला) येथील शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री. श्रीकुमार वानखेडे आंबेठाण येथे अंगारमळ्यात 'कारसेवा' करण्यासाठी पंधरा दिवस मुक्कामाला होते. त्यांचा मुक्काम संपल्यानंतर एका संध्याकाळी त्यांना सोडण्यासाठी चाकण येथील एस्टी स्थानकावर गेलो होतो. तेथे बसची वाट पहात बोलत उभे असताना अचनक कोणीतरी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. अशा परक्या ठिकाणी कोणाचातरी हात पाठीवर पडला म्हणून घाबरून त्यांनी मागे वळून पाहिले. एक विशीच्या आतला तरूण त्यांच्याकडे पहात म्हणाला, 'मी तुम्हाला ओळखतो, तुमचे नाव माहीत नाही पण ललील बहाळेंच्या आमच्या गावातील एका सभेच्या वेळी त्यांच्याबरोबर तुम्हाला पाहिले होते.' थोड्याफार सैलावलेल्या मनःस्थितीत श्रीकुमार त्याच्याशी बोलू लागले, त्याची विचारपूस करू लागले. तोही मनमोकळेपणाने सर्व माहिती सांगू लागला.

एकीकडे त्यांचे बोलणे ऐकत असताना मन विचार करू लागले. चाकण परिसरातील औद्योगिक क्षेत्र आता आताच विकसित होऊ लागले होते. राज्यातील विविध भागातील शिक्षित तरूण , त्यांच्या भागात 'सन्माननीय' रोजगार उपलब्ध नसल्याने रोजगाराच्या शोधात चाकण परिसरात येऊ लागले होते. ज्यांच्या हाती तांत्रिक किंवा प्रशासकीय अर्हता होती अशी भाग्यवान मंडळी कंपन्यांमध्ये नोकरीला लागलीही. पण, ज्यांच्या हाती अशी अर्हता नाही ती मुले 'लेबर काँट्रॅक्टर'च्या माध्यमातून परिसरात उभ्या रहाणार्‍या कंपन्यांमध्ये पडेल ते काम करू लागली. आपल्या आधी आलेल्या एखाद्या परिचित तरुणाच्या मदतीने एखाद्या दहा बाय बाराच्या रूममध्ये साताठ मुलांबरोबर राहू लागली. हाती पडणार्‍या पगारातून (खरे तर मजुरीतून) रूमच्या भाड्यातील वाटा, प्रवास यासाठी खर्च झाल्यानंतर उरलेल्यात पोटाची भूक भागवायची तर रूमवरच सर्वांनी मिळून आळीपाळीने काहीतरी रांधून खाण्याशिवाय पर्याय नसतो. रूममधील पार्टनर वेगवेगळ्या भागांतून आलेले त्यामुळे भावनिक जवळीक तयार होणे असंभव. मग घरापासून दूर, ज्यांच्या बरोबर आयुष्यातील आतापर्यंतची अठरावीस वर्षे वाढलो त्यांच्यापासून दूर आलेली ही मुले, कामातून मोकळा वेळ मिळाला की जवळीकीच्या आधाराच्या शोधात भिरभिरत रहातात.

श्रीकुमार वानखेडेंना पहाताच आंतरिक ओढीने त्यांच्याकडे आलेला हा मुलगा त्यांच्यापैकीच; घरादारापासून दूर, लहानपणापासूनच्या मित्रमंडळींपासून दुरावलेला, ज्या दर्जाचे काम गावाकडे करावे लागल्यास कुटुंबाला कमीपणा येईल असे वाटे त्याच दर्जाच्या कामाच्या चरकात पिळला जाणारा.
श्रीकुमारांना घेऊन जाणारी बस आली की काही क्षणासाठी लाभलेली ही 'हिरवळ' दूर होणार याची खंत चेहर्‍यावर दिसणार्‍या त्या मुलाला मी अनाहूतपणे म्हणालो, 'केवळ पोट भरण्यासाठी घरदार, गावाकडचे सखेसवंगडी सोडून इतक्या दूरवर आलेल्या तुझ्यासारख्या मुलाला एकटेपणा जाणवणे, घराची आठवण होणे साहजिकच आहे. तशी कधी आठवण झाली तर काम सोडून घरी जाणे शक्य नाही कारण पुन्हा काम शोधणे म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आणि, सुदैवाने, रजा मिळाली तरी नेहमी नेहमी परवडणारेही नाही. तेव्हा, कधी घराची आठवण झाली आणि घरी जाण्याची इच्छा झाली तर आपले घर समजून अंगारमळ्यात हक्काने येत जा सुट्टीच्या दिवशी.' माझ्या या निमंत्रणाने, आतापर्यंत त्याने मोठ्या धीराने आणि कसोशीने बांधून ठेवलेला भावनांचा कल्लोळ उचंबळून बाहेर पडला आणि तो घळाघळा अश्रू गाळत ओक्साबोक्सी रडला. त्याला तसाच मोकळा होऊ दिला आणि नंतर विचारले, 'काय झाले?' तर म्हणाला, 'असं आपलेपणाने बोलणारं कुणी गेल्या तीन महिन्यांत भेटलंच नाही.'
तो कधी अंगारमळ्यात आलाच नाही. काय झाले असेल त्याचे? येथील जगण्याची लढाई हरून गावी परत गेला असेल का? का परिस्थितीचे टक्केटोणपे खात मनाने निबर होऊन महिन्यांची टोके जोडीत निर्वासितासारखा जगत असेल?

विदर्भातील असे अनेक तरूण पुण्यामुंबईच्या औद्योगिक परिसरांत कोळसा झालेल्या मनाने निर्वासितासारखे जगत असतील.

प्रामुख्याने निवडणुकीच्या हंगामात अनेक लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत बोलतात. त्यांच्या विचारांत अशा या तरुणांच्या मनांना पुन्हा उभारी आणण्याचे, त्यांना त्यांच्या 'घरी' परतण्याची सन्माननीय संधी देण्याचे काही आहे का?

- सुरेशचंद्र म्हात्रे
-------------------------------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया