नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा

गंगाधर मुटे's picture


कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

                                                            - ज्ञानेश
---------------------------------------------------------------------------------

Share