Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



श्याम्याची बिमारी

प्रकाशीत: 
(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)
श्याम्याची बिमारी
 
             श्याम्या म्हणजे एक रोखठोक आणि सरळसोट स्वभावाचा मनुष्य. मनात येईल तसे बेधडक व्यक्त होणे, हे त्याचे गूणवैशिष्ट्य. कणाकणातून ज्ञानार्जन करण्यासाठी त्याचा सदैव प्रयत्न चाललेला असतो आणि तरीही वाचनाच्या बाबतीत श्याम्या मात्र फारच अभागी मनुष्य आहे असे मला वाटते. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फारसे लाभले नाही. कधी आर्थिक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलिक स्थितीमुळे त्याच्या संचारप्रदेशात पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे असे घडले असावे.
 
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
 
          खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उजव्या हाताने जेवण करताना डाव्या हातात पुस्तक घेऊन वाचता-वाचताच जेवण करताना किंवा समोरच्या माणसाशी बोलत असताना सुद्धा त्याची नजर पुस्तकावरच खिळून असल्याचेही मी अनेकदा बघितले आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा, कादंबरी, कविता, गझल, लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
 
पण हाती घेतलेले पुस्तक त्याने शेवटापर्यंत वाचून काढले, असे मात्र फारसे घडत नाही. कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरुवात करतोय पण काही पाने वाचून झाली की, त्याला असे वाटते की हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशील आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फेकून देतो.
       कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरुवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते की ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचारांशी, भूमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार, भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फेकून देतो.
 
         तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता फार आवडते कारण त्यात जे श्रावण महिन्याचे वर्णन आले ना, ती केवळ कविकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सुरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
 
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे"
किंवा 
"झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे"
 
हे दृश्य केवळ श्रावण महिन्यातच पाहायला मिळते. इतर महिन्यात नाहीच.
 
कवी, कविता आणि श्रावणमास एकमेकाशी एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार. त्याला असे वाटते की, कवीने खूप परिश्रम घेतले असणार ही कविता लिहिण्यावर. संपूर्ण श्रावणमासाचे अवलोकन केले असणार, अभ्यास केला असणार आणि कवी श्रावणमासाशी तद्रूप झाला असणार, तेव्हा कुठे ही कविता आकारास आली असावी. कविता लिहून झाल्यावर एवढा प्रदीर्घ काळ लोटला पण अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो आणि तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.
 
       याउलट ना. धो. महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्तुंग लोकप्रियता लाभलेली पण श्याम्याला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
 
        त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. आणि भुईला दिलेल्या दानावर नभ अजूनही ठाम व प्रामाणिक आहे म्हणून तर ही सजीवसृष्टी टिकून आहे. देशाची लोकसंख्या चमत्कारिक गतीने वाढत असतानाही सर्वांना पोटभरून खायला पुरेल आणि सडायलाही शिल्लक साठा उरेल एवढे मुबलक अन्नधान्य या देशात पिकते. नभाचे दान आहे म्हणूनच असे घडते ना?
 
           मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. मग समजा नभाने या अतिरिक्त दानाची आराधना स्वीकारली, भरमसाठ उत्पादन आले आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जरी जखडलेत तरी त्याने काय घडणार आहे, असा श्याम्याचा सवाल आहे. कवीने ज्या शेतकरी समाजाच्या भल्यासाठी हे अतिरिक्त दान मागितले, त्या शेतकर्‍याच्या पदरात काय पडणार आहे? हाच लाखमोलाचा प्रश्न आहे, असे त्याला वाटते. शेतीमध्ये जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जखडायला लागल्याबरोबर प्रचलित व्यवस्थेनुसार कोणतेही सरकार चांदणे, सूर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टिकोनातून बघणार, अतिरिक्त उत्पादन येऊनही "ग्राहकासाठी शेतमाल स्वस्तात उपलब्ध झाला पाहिजे" या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने निर्यातबंदी लादणार आणि या सूर्य, चंद्र तार्‍यांना "कांदाभजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करणार. कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानित किंमतींत सूर्य, चंद्र तारे उपलब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, कचरापेटीत व नालीच्या प्रवाहात सूर्य, चंद्र, तारकांचे ढिगारे साचलेले दिसतील. त्यामुळे मुबलक पिकण्याचे आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र लागण्याचे कवीचे स्वप्न साकार होईल.
 
पण ज्या शेतकर्‍यांसाठी हिरिरीने एवढे मोठे दान मागितले त्याच्या पदरात काय पडणार आहे? शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर त्याची दरिद्री आहे तशीच राहणार आहे, सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्या ऐवजी कवीने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, विजेच्या लखलखाटाने सरकारचे डोके ठिकाणावर यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससूर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नसते का ठरले? त्यातल्या त्यात कवी बिगर शेतकरी असता तर श्याम्याची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तूरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभीर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हातात घेतो आणि फेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखील भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
 
          पण श्याम्याला भुरळ पडेल तर तो श्याम्या कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याच्या घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफार थांबावे आणि कवीला (श्याम्याला देखील) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे होऊन शेतकर्‍याचा घरात आनंदीआनंद नांदावा यासाठी पुढे मग कवीने काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थिती उद्भवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दूर भिरकावून देतो.
 
मात्र श्याम्याचे तर्कशास्त्र विचित्र असले तरी तो त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद करतो, तो मात्र खरेच बिनतोड असतो.
 
मी त्याला एकदा म्हटले की, शाम्या तुला कलेचा आस्वाद घेताना त्यातील उपयुक्ततेचाच शोध घेण्याची सवय जडली आहे. कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा तुला अंदाज आलेला नाही. अरे Rita Mae Brown यांनी असे म्हटलेय की "Art is moral passion married to entertainment. Moral passion without entertainment is propaganda, and entertainment without moral passion is television."  त्यामुळे तुला कलेचा आस्वाद घेण्यासाठी तुझे मन मोठे करण्याची गरज आहे!
त्यावर शाम्या उसळलाच आणि म्हणाला की कलेचा पैस किती मोठा असू शकतो याचा मला अंदाज आलेला नाही, असे मोघमपणे म्हणता येणार नाही. तसे असते तर मी पुस्तकाला हातच लावला नसता. माझे मुळ दु:ख, या देशातल्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त असलेल्या आम जनतेचे साहित्यामध्ये विपरीत उमटणारे प्रतिबिंब, त्यांच्या समस्यांची सोडवणूक होण्यापेक्षा गुंतागुंत वाढविणारा आशय, त्यांच्या समस्यांकडे इतरांनी पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, त्यात आढळणारा बेगडीपणा यात दडलेले असावे कदाचित.
श्याम्याच्या मते लेखनासाठी दोन पर्याय असू शकतात.
 
१) लिहिणार्‍याने वाटेल तसे लिहीत राहायचे, ते इतरांवर लादत राहायचे आणि जर त्यांनी नाराजीचा, नावडल्याचा सूर काढला तर त्यांना "कलेची कदर नाही" अशी त्यांची संभावना करायची.
२) लिहिणार्‍यांनी आत्मपरीक्षण आणि अभ्यास करून तळागाळातल्या जनसामान्यांचे जीवन कसे सुकर होईल, याचा वेध घेऊन लिहिण्याचे कसब अंगी बाणण्याचा प्रयत्न करणे. जे काही लिहायचे, ते लिहिताना त्या लिखाणाचे समाजावर काय बरे वाईट परिणाम होतील याचाही थोडाफार विचार करायचा. ज्वलंत विषय हाताळायचे असेल तर शक्य तेवढा त्या विषयाच्या आतखोलवर शिरायचा प्रयत्न करायचा. आणि नंतरच लिहायचे.  
 
दोनपैकी तुलनेत पहिलाच पर्याय सोयीचा व विनाकष्टाचा असल्यानेच कदाचित अनादीकाळापासून हाच मार्ग अवलंबीला जात असावा, असे श्याम्याचे मत आहे.  
शाम्याच्या विचारांना काही लोक एकांगी मानतात. पण शाम्याला हे मान्य नाही. याउलट भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन केलेले लेखन किंवा सरकारची मर्जी राखण्यासाठी धडपड करून जाणीवपूर्वक केलेले लेखनच एकांगी मानायला हवे असे शाम्याचे आग्रही मत आहे.
 
आणि म्हणून जेथे संधी मिळेल तेथे त्याचं सदैव एकच आणि एवढंच तुणतुणं वाजत असते.  
त्यातूनच त्याला बिमारी जडली.  
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
या प्रकाराला कुठला आजार किंवा विकार म्हणावे बरे?
 
- गंगाधर मुटे
...............................

Share