नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अॅग्रोवन प्रकरण एक इष्टापत्ती

Anil Ghanwat's picture

अॅग्रोवन प्रकरण एक इष्टापत्ती

माझ्या पत्नीच्या गुडघ्यावर इलाज करण्यासाठी, रहाता व शीर्डी दरम्यान एका दवाखान्यात तिला अॅडमिट केले होते. दि. २८ मे च्या संध्याकाळ पासून सलाईन व इतर इलाज सुरू झाले होते. दि. २९ ला सकाळीच रमेश खांडेभराडांचा फोन आला व अॅग्रोवन मध्ये एक लेख आला आहे, त्यात बरंच काही चुकीचे लिहिले आहे तेवढे पहा म्हणाले. गावा पासून दूर असल्यामुळे पेपर मिळणे अवघड होते . मोबाइल मध्येच अॅग्रोवन वाचला.
वृंदावनातल्या विधवा, शरद जोशींनी तडजोड केली, रघुनाथ दादा वारसा चालवतात, शरद जोशींची किल्ली आता उपयोगाची नाही वगैरे वगैरे वाचून संताप झाला. रमेश जाधवचा फोन नंबर नव्हता. ज्या अॅग्रोवनच्या पत्रकारांचे नंबर होते त्यांच्यावर जाळ काढला. यांना धडा शिकवायचाच असा निश्चय केला.
तो पर्यंत बऱ्याच कार्यकर्त्यांनी लेख वाचला होता. विचारणा होऊ लागली काय करायचं? मग होळी करायचे आदेश दिले. लातूरचा पहिला होळीचा फोटो आला मग सुरूच झाले. फोटो , व्हिडिअो यायला सुरू झाले. माझ्याकडे असलेल्या ६ अॅग्रोवनच्या पत्रकारांना मी प्रत्येक जिल्ह्यातील होळीचा एक फोटो त्यांना पाठवीत राहिलो.
कोणीतरी रमेश जाधवचा नंबर दिला मग त्याची पण हजामत झाली. दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारून भंडावुन सोडले. एका बाबतीत जाधवला मानलं पाहिजे, दिवसभर त्याला सतावणारे फोन येत होते पण त्याने फोन नाकारले नाहीत किंवा बंद करून ठेवला नाही. उत्तरे देत राहिला.
दुसऱ्या दिवशी सीमाताईंच्या नेतृत्वाखाली ७-८ कार्यकर्ते अॅग्रोवनच्या कार्यालयात धडकले. सीमाताईंना सक्त ताकीद दिली होती की संघटनेची प्रतिमा खराब होईल असे काही बोलायचे नाही व तोडफोड करायची नाही. अनिल चव्हाणांना सीमाताईंना कंट्रोल मध्ये ठेवण्याची जबाबदारी दिली होती. सह संपादक श्री. गाडे यांच्याशी शांततेत चर्चा झाली व " आमच्या अध्यक्षांनी पाठवलेले उत्तर जर छापले नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत" असा सज्जड दम भरून ही तुकडी परतली.
दि. ४. मे. २०१८ ला अॅग्रोवनचे मुख्य संपादक यांनी फोन करून सीमाताईला व मला भेटीसाठी बोलावले. दोन तास घमासान चर्चा झाली लेखावर तर झालीच पण कार्ल मार्क्स पासून सर्व जगात खाजगी करण झाले तर काही कंपन्यांच्या हातात जगाची सत्ता असेल इथं पर्यंतच्या विषयांवर गांभीर्याने चर्चा झाली. अॅग्रोवनच्या इतिहासात कोणी होळी केली नव्हती ती संघटनेने केली याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
संघटने बद्दलचे त्यांचे मत बदलून गेले. आपल्यात संवाद नसल्यामुळे हे सर्व घडले असा निष्कर्ष त्यांनी काढला. पुण्यात आले तर येत जा. रघुनाथदादा, पाशा पटेल कधी आले तर आवर्जून येतात म्हणाले. बरोबर आहे ते. मनाला पटले ही तरी , बातम्या लागण्यासाठी संपादकांचे पाय धरणाऱ्या पैकी आम्ही नाहीत हे ही ठासून सांगून आलो.
शेतकरी संघटनेचे व अॅग्रोवनचे ध्येय एकच आहे. व शेतकरी स्वातंत्र्या शिवाय मार्ग नाही हे दोघांना मान्य आहे तर एकमेकांना मदत करून शेतकऱ्यांचे काही भले करायचा प्रयत्न करू असा सूर चरचरेच शेवटी निघाला. संपादक अजिनाथ चव्हाण, सह संपादक गाडे व उपसंपादक रमेश जाधव तिघेही शेतकरी कुटुंबातले व शरद जोशींचे चाहते. आता राजकीय यश मिळण्याची सुद्धा संधी आहे हे त्यांनी कबूल केले.
शरद जोशींचे चरित्र अंगार वाटा व भारत उत्थान कार्यक्रमाची पुस्तिका अॅग्रोवनला भेट देऊन विजयी अंतःकरणाने बाहेर पडलो.
रविवारच्या अंकात माझे उत्तर छापून आले. सकाळ पासून राज्यभरातून अभिनंदनाचे फोन सुरू झाले. विशेष म्हणजे संघटने पेक्षा संघटने बाहेरचे फोन जास्त होते. तरुण मुलांचे होते. लेख आवडला, आम्हाला पण "या" संघटनेत काम करायचे आहे म्हणाले. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातून, जिथे आपल्याला एकही कार्यकर्ता नाही अशा ठीकाणाहून फोन आले. २० तारखेच्या तंत्रज्ञान परिषदेला येतो म्हणाले आमच्या भागात सभा लावून संघटनेचे काम सुरू करतो म्हणाले. रमेश पाध्ये सारख्या विचारवंताने सुद्धा फोन करून चर्चा केली. सोशल मिडियावर ही हा लेख बराच गाजला.
तसा मी काही लेखक नाही पण संघटनेची टिंगल सहन झाली नाही म्हणून आमची सटकली अन् लेखात सगळी भडास उतरवली. गंगाधर मुटे म्हणतात माझ्यातल्या लेखकाचे कौतुक झाले. गंगाधररावची कामाला जुंपून द्यायची ही कला आवडली.
दवाखान्यातल्या खाटेवर सलाईन घेत पडलेली माझी बायको माझा संताप, आदेश, सूचना, संवाद सगळं मुकाट्याने पाहत होती. तिला अॉपरेशन थिएटर मध्ये कधी नेले मला माहीत नाही पडले. रात्री २.०० वाजले तरी मोबाइल वर उत्तर टाइप करायचे काम सुरूच होते. तिने पडल्या पडल्याच आदेश दिला " झोपा आता, दोन वाजले" २.३० वाजता लेख पूर्णं झाला तेव्हा कुठे झोपावं वाटलं.
 
अनिल घनवट 
दि. ७/५ /२०१८ (सायं ६.५०) 

********************

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share