नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्री ब.ल.तामस्कर यांना ज्ञानश्री पुरस्कार

गंगाधर मुटे's picture

श्री ब.ल.तामस्कर यांना ज्ञानश्री पुरस्कार


जमीन विकून । पुरस्कार दिला ।
प्रेमे गौरविला । कार्यकर्ता ॥

* * * *
Tamaskar
* * * *

           कुठलाही पुरस्कार म्हणजे कसे चित्र उभे राहते? एखादे अण्णासाहेब, दादासाहेब, रावसाहेब, नानासाहेब यांची शासकीय अनुदानावर पोसलेली संस्था असते. त्यातील कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात करून हे दादासाहेब, रावसाहेब एखाद्या पुरस्काराचा जंगी फड लावतात. शिवाय यालाच समाजसेवा म्हणून सगळीकडे मिरवले जाते. पुरस्काराला येणारा पाहुणा या शासकीय पैशावर पोसलेल्या बांडगुळांच्या झगमगाटाला भुरळतो. आणि समाजाला अशा समाजसेवकांची कशी गरज आहे हे कंठशोष करून सांगतो. आपल्या मानधनाचे जाडजूड (त्याच्या दृष्टीने जाडजूड अन्यथा दादासाहेब, रावसाहेबांना ही रक्कम म्हणजे चिल्लर- एका रात्रीत उधळण्याइतकी) पाकीट स्वीकारत आपल्या गावी परत जातो.
           अंबाजोगाईच्या ज्ञानश्री प्रतिष्ठानचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार मात्र अतिशय वेगळ्या जातकुळीचा. जातकुळीचा म्हणायचे कारण मंचावरून प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीरंगनाना मोरे आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आम्ही तीन भावू. त्यातला मी थोरला.’’ ऐकणार्‍यांना वाटले नाना आपल्या कौटुंबिक बाबींबद्दल बोलत आहेत. ‘‘ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी धाकले भास्कर भावू, आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी धाकले शरद जोशी.’’ एक मराठा, एक माळी, एक ब्राह्मण हे तीन भावू. नुसती जातकुळीच नाही तर "माझे सहकारी अमर हबीब" म्हणत नानांनी धर्मकुळीही ओलांडली.
           श्रीरंगनाना मोरे यांनी अंबाजोगाईला शरद जोशींच्याही आधी शेतकरी संघटना सुरू केली. त्यांनी शरद जोशींचे विचार ऐकले आणि मोकळेपणाने, मोठ्या मनाने आपली संघटना शेतकरी संघटनेत विलीन केली. नानांनी आपली दोन एकर जमीन विकली. ती रक्कम बँकेत ठेवली आणि तिच्या व्याजावर दरवर्षी एक लाख रुपयाचा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार सुरू केला. नाना वारकरी घराण्यात जन्मले. ‘‘आजच्या काळात वारकरी म्हणजेच शेतकरी हे माझ्या लक्षात आले. आणि शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोडणारा शरद जोशी हाच आमचा विठ्ठल’’ इतकी स्वच्छ नितळ भावना नानांनी मनी बाळगली. पहिला पुरस्कार अर्थातच शरद जोशींना दिला. रा.रं.बोराडे यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार कोणाला देणार हा प्रश्न बोराडे सरांनी तेव्हाच विचारला होता.
           गेली तीस वर्षे तन (शरीर फाटके) मन(खंबीर) धनाची (खिसा फाटका) खर्‍या अर्थाने पर्वा न करता शेतकरी संघटनेत झोकून देणार्‍या ब.ल.तामसकर यांचे नाव निश्चित झाले आणि सर्वच कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. मी ज्या ‘जातकुळीचा’ उल्लेख सुरवातीला केला आहे. त्याच पंगतीतले पुढेच नाव म्हणजे ब.ल.तामसकर. आजतागायत त्यांची जात जवळच्या लोकांना कळली नाही. अमर हबीब यांनी या संदर्भात मोठी करून आठवण मला सांगितली. ब.ल. यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी अमर हबीब औंढा नागनाथला ब.ल.च्या गावी गेले होते. अंत्यसंस्काराच्यावेळी ब.ल.ची जात उघडी पडली असं अमरनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. ब.ल. तामसकर यांचे नाव बब्रुवान आहे हेही कुणाला माहीत नाही. त्यांना सगळे ब.ल. असंच म्हणणार.
           कुणाला कार्यकर्त्याची व्याख्या करायची असेल तर मराठवाड्यात ब.ल.पेक्षा लायक माणूस कोणीच सापडणार नाही. ब.ल. यांच्याकडे चारचाकी तर सोडाच पण दोन चाकीही गाडी नाही. सायकलही नाही. कोणालाही झापू शकणारी झणझणीत जीभ हे ब.ल. यांचे खरे भांडवल. भाषणात शरद जोशी यांनीही त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सगळ्यांना शिव्या देता, कुत्र्या म्हणता. मलाही कदाचित कधी माघारी म्हणाला असाल.’’ निर्मळ मनाचा क्षोभक कार्यकर्ता असे वर्णन शरद जोशी यांनी त्यांचे केले आहे.
           मंचावर पाहुण्यांच्यामध्ये चांगल्या कपड्यात बसलेले ब.ल.खूप अवघडल्यासारखे दिसत होते. मला तर भिती वाटत होती की कुठल्याही क्षणी ते उठून सरळ चालायला लागतील.
           1983 साली ब.ल.पहिल्यांदा माझ्या घरी आले तेव्हा त्यांचे वर्णन कुसुमाग्रजांच्या कवितेमधल्या सारखेच होते, ‘‘कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी’’. बरं परत पैश्याच्या बाबतीतही कवितेत शोभणारीच स्थिती, ‘‘खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला...वगैरे’’ अर्थात त्यांच्या बाबतीत एकटेपणाला जराही संधी नाही कारण ब.ल. सतत कशात तरी पूर्णपणे गुरफटलेलेच राहिले आहेत. ब.ल.यांना मिळालेला हा एक लाख रुपयांचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार पद्मश्री पेक्षाही मोठा आहे असं गुणवंत पाटील म्हणाले ते खरंही आहे. ब.ल.यांना तसे पैशाचे महत्त्व नाही. त्यांनी पोट भरण्यासाठी काय उद्योग केला हे कुणालाही माहीत नाही. त्यांचे मराठवाडा विकास आंदोलनातले सहकारी नरहर कुरुंदकरांचे जावई दीपनाथ पत्की यांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘‘ब.ल.हा माझा जुना मित्र. त्याची नेहमी अडचण असायची. पण त्यानं मलाच काय पण कुणालाही पैसे मागितल्याचे माहीत नाही.’’ माझी आजी तेव्हा माझ्या वडिलांना गमतीने म्हणायची, ‘‘तुझ्या ब.ल.ला दोन दिवस सर्फ मध्ये बुडवून ठेव. म्हणजे जरा स्वच्छ होईल.’’ ब.ल. हे भणंग कार्यकर्त्यासारखे पायी, मिळेल त्या वाहनाने, कशाचीही पर्वा न करता फिरणार. मग कपड्यांना इस्त्री करायची कुठून? सर्वसामान्य जनतेत कायम रमणार्‍या माणसाने घामाचा वास आणि धुळीचा सहवास टाळायचा कसा?
           मराठवाडा विकास आंदोलनात वसमत येथे 1974 रोजी लिपिकाच्या भरतीसाठी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात पोलिसांनी गोळीबार केला आणि 2 युवक ठार झाले. तेव्हा या गर्दीचे नेतृत्व करीत होते ब.ल.तामसकर. त्यांच्या जहाल भाषणाने पोलिसांची डोकी भडकली. खरं तर ब.ल. तेव्हा सर्वसामान्य बेरोजगार युवकांच्या काळजातील वेदना आपल्या शब्दांत मांडत होते.
           ‘शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत आलो आणि मला मोठा कॅनव्हास मिळाला.’ असे मोठे अभिमानाने पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात उभं राहून भाषण न करू शकणारे शरद जोशी यांनी आज ब.ल.यांच्या पुरस्कार सोहळ्यात मात्र उठून भाषण केलं. त्यात श्रीरंगनाना यांच्याबद्दल जी आदराची भावना होती त्या सोबतच ब.ल.सारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचाही भाग होता. एरवी मोठी जहाल भाषणं करणार्‍या ब.ल.यांना या वेळेस मात्र बोलता आलं नाही. गहिवर दाटला म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच मंचावर दिसत होतं. शरीरात रक्त असेपर्यंत मी चळवळीचा झेंडा खाली ठेवणार नाही अशी घोषणाच त्यांनी केली. खरं तर ब.ल.यांच्याकडे पाहिल्यावर यांच्या शरीरात रक्त असेलच किती असा प्रश्न सहजच मनात येतो. कारण दिसतात ती फक्त हाडं. पण अशा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा प्रचंड असते. आज कार्यकर्ता म्हणजे नेत्यासाठी हप्ते वसूल करणारा आणि त्याचे हप्ते दुसर्‍यांना पोचविणारा दलाल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर साक्षात आपल्या नेत्याला शरद जोशींना, ‘‘तुम्ही तुमच्या गाडीनं जा. मला यायचे नाही. मी आपला माझ्या पद्धतीनं पायी फिरून प्रचार करतो आहे.’’ असं सुनावणारा ब.ल.तामसकर सारखा कार्यकर्ता ठसठशीतपणे उठून दिसणारच.
           श्रीरंगनाना मोरे सारख्या एका निष्ठावान शेतकर्‍याला, वारकर्‍याला असं मनापासून वाटलं की आपण ज्या चळवळीत खस्ता खाल्ल्या, हाल सहन केले, कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही त्या चळवळीतील कार्यकर्त्यासाठी कृतज्ञता म्हणून एक पुरस्कार सुरू करावा. ही भावना आजच्या काळात खरंच फार महत्त्वाची आहे.
           सामाजिक क्षेत्रात निःस्पृहपणे काम करणारे कार्यकर्ते आज मिळणं मुष्किल गोष्ट होवून बसली आहे. आणि समाजातील प्रश्न तर वाढतच आहेत. शेतकरी चळवळीनं भारत वि.इंडिया अशी मांडणी केली होती. इंडिया म्हणजे सगळे शहरी तोंडवळ्याचे नोकरदार लोक भारतातील शेतकर्‍याला लुटत आहेत. आज परिस्थिती अशी आली आहे की भारत तर लुटून कंगाल झाला. आता या नोकरदारांनी इंडियालाही लुटायला सुरवात केली आहे.
           मला एका गोष्टीचे कोडे उलगडत नाही. 25 वर्षांपूर्वी कापूस आंदोलनात सुरेगाव (जि.हिंगोली) येथे गोळीबार झाला होता. 3 शेतकरी हुतात्मा झाले. त्यात माझ्या वडिलांना 10 दिवसांचा तुरुंगवास परभणीला झाला होता. आज शहरात आलेला मी त्यांचा मुलगा शहरातल्या रस्त्यांसाठी आंदोलन करतो आणि मला हर्सूल तुरुंगात पाठविण्यात येते. काल जी स्थिती भारताची होती ती आज इंडियाची झाली आहे. अशा काळात ब.ल.सारखे कार्यकर्ते हवे आहेत. छोटं मोठं आंदोलन केलं की सगळ्यांना वाटतं, ‘‘कशासाठी केलं? आता निवडणुकीला उभं राहणार का? याला यातून काय भेटणार?’’ आणि वर्षानुवर्षे आंदोलन करणारे, तुरुंगात जाणारे, लाठ्या काठ्या खाणारे ब.ल.सारखे लोक पायी भणंग फिरत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की आपली आपल्यालाच लाज वाटते.
                                                                                                                               - श्रीकांत उमरीकर
* * * *
Tamaskar

* * * *
Tamaskar
* * * *

मराठवाडा समाचार
Share