नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

जाच

Gujarathi sandip Vikas's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता

काळ्या मातीत राबतो। माझा काळाच रे बाप
दुःख मोजावे कशाने । थिटे झाले सारे माप
मोल फुकट घामाचं । कशालाच नाही भाव
सावकाराच्या वहीत । दरवर्षी येई नाव
आता बघवत नाही । मायचाही गळा सुना
म्हणे धनीच गं माझा गळ्यातला डाग जुना
आम्ही अंधाराचे धनी बोजे कर्जाचे वाढले
काळजाचे केले पाणी शेत विकाया काढले
किती नशीब फुटकं बाप कोरडाच रडे
आता सुखाचं सपान कुणालाच नाही पडे
जीव झाला चोळामोळा सारे उपाशी तापाशी
प्रेम दिलं पोटभर घेतली बापानं फाशी
पेपरात बातमीही आली तळाला छापून
कुणी वाचली फाडली नाही ठेवली जपून
रात्री तीच बातमी, मी डोळेपुसून कापली
कुणालाच का वाटावी आहे उगीच आपली
शासनाची मदत कागदावर राहिली
मृतात्याम्यासही फक्त फुले शब्दांची वाहिली
सरकारनं केलंय म्हणे कर्ज आता माफ
पैसा नकोय साहेब परत देता का बाप
माझ्या बापानं जे केलं तसं करु नका कुणी
हात जोडतो तुम्हांला दिस येतो सोन्यावाणी

Share

प्रतिक्रिया