थांबा!

Raosaheb Jadhav's picture

*थांबा!*

थांबा!
उत्खनन चालू आहे.

फाडत होता तो छाती मातीची,
कालपरवापर्यंत नांगराच्या फाळाने
नांगरत नशीब स्वतःचे...

आणि घालतही होता टाके
हाती घेऊन कुदळ फावडे
पोहचवण्यासाठी कुणब्याचे कसब
पुढल्या पिढीपर्यंत,
थाटात शल्यविशारदाच्या...

सोबतच उरकली होती पेरणीही त्याने
करत हवाली
काळजाच्या ठोक्यांना
कोंबाळत्या 'बी'च्या...

पण मरून गेलाय तो आज अचानक...
आत्महत्त्या केलीय त्याने...म्हणे...

पण थांबा!
हत्त्या की आत्महत्त्या?
उत्खनन चालू आहे...

तोपर्यंत करू आयोजित
एखाद्या चौकात एखादा 'कँडलमार्च'
जमलंच तर 'मोर्चा'
नाहीतर देऊन टाकू एखादे 'पॅकेज'
अंत्यविधीच्या वाटेवर मूडद्याच्या पदराला
बांधलेल्या वाफाळत्या भातासारखे
जे फेकता येईल सोडून
अर्ध्या रस्त्यातच...

पण थांबा!
हत्त्या, आत्महत्त्या की नैसर्गिक मृत्यू?
उत्खनन चालू आहे...

तोपर्यंत जमलेच तर
मांडून पाहू राजकीय गणिते.
नाहीतर भांडत राहू
घालत वाद वैचारिक चर्चांचे
नाहीतर करू कौतुक जरा त्याचे
पोशिंदा बिशिंदा अशी काहीतरी
जोडत विशेषणे.
नाहीतर त्यानेच पिकवल्या कापसाच्या
बोळ्यांतून दरवळत्या सुगंधाचे
किंवा जरा गुंगी आणू त्याला
त्याच्याच मळ्याच्या उसाच्या
मळीतून मिळालेल्या मद्याच्या
रिचवत चार बाटल्या...

पण थांबा!
इतिहास, वर्तमान की भविष्य?
संशोधन चालू आहे...

आणि चालू आहे पेरणीही
झिरपत्या वांझ लेखण्यांतून सोबतच
जागतिकीकरणाचे दावत आमिष
त्याच्या कर्जबाजारी शिवाराला...

पण थांबा!
तट्टम पोट, आंधळे मठ की व्यवस्थेचे तट?
जबाबदारी व्हायचीय निश्चित अजून
उत्खननात मिळालेल्या निष्कर्षांवरून...

पण थांबा!
आता मी टाकणार आहे निब्बर कानाखाली
कानावर हात ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या
कारण आता जरा
धरलाय वाफसा,
माझ्याही घामाच्या धारांतून
भिजल्या मातीने
नुकताच...

रावसाहेब जाधव (चांदवड)
9422321596

लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७

प्रतिक्रिया

Raosaheb Jadhav's picture

धन्यवाद!!!

रावसाहेब जाधव (चांदवड)

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! CongratsCongrats

Rajesh Narayan Jaunjal's picture

खूप छान कविता सर.