नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या ठिकाणी...

पंकज गायकवाड's picture
लेखनप्रकार: 
कथा

महाराष्ट्रात भाषण शैलीचे अनेक प्रकार आढळून येतात. त्यापैकी मला बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन आणि अटलजी यांची भाषण शैली जास्त आवडते. प्रत्येकाची आपापली एक खासियत असते. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, धनंजय मुंडे यांची भाषणे ही भाषणे नसून जणू काही श्रोत्यांच्या मनाला भिडणारा संवाद असतो. अटलजी, प्रमोद महाजन, शरद पवार, अजित पवार यांच्या भाषणात त्या विषय संबंधी सर्वच्या सर्व मुद्दे सामावून घेतलेले असतात. बाळासाहेबांच्या भाषणादरम्यानचा समयसुचक विराम सुद्धा टाळ्यांचा कडकडाट घेऊन जातो.

छ. उदयनराजे भोसले, अजित पवार, रावसाहेब दानवे आणि बच्चू कडू हे अनकेदा आपल्या भाषणा मुळे अडचणीत आल्याच्या बातम्या आपण वाचतो. पण अडचणीत आले अस फक्त पुस्तकी भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि माध्यमांना वाटतं प्रत्यक्षात त्यांची ही शैली ग्रामीण भागातील समर्थकांना जास्त भावते आणि ग्रामीण भागातील लोकांना कधीच ही भाषा गैर वाटत नाही उलट त्यांना ती भाषा आपली वाटते म्हणून ते सभेला गर्दी करतात.

आता ग्रामीण भागातील विशिष्ट भाषण शैलीबद्दल पाहुयात. शेतकरी सभा, लग्न असो वा मयत दशक्रिया विधी सर्व ठिकाणी एकचं सूर असलेली शैली आढळून येते किमान आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तरी. आणि या भाषणादरम्यान सर्वात जास्त उच्चारला गेलेला शब्द म्हणजे या ठिकाणी... आणि या ठिकाणी... तसेच या ठिकाणी... म्हणून या ठिकाणी... त्यामुळे या ठिकाणी... नेमकं काय ठावठिकाणा त्यांना दाखवायचा असतो हेच कधी उमगलं नाही. ना मला उमगला ना समोर बसलेल्या श्रोत्यांना उमगला.

असच एक विवाह समारंभात गेलो, सोबत आमचे सहकारी मित्र होते आणि समोर मानपान भाषण सुरू होते. तो मित्र बराच वेळ मोबाईल मध्ये काहीतरी आकडेवारी करत होता. ना राहवून त्याला विचारलं की 'अरे बाबा काय करतोय एकटा मोबाईल सोबत? बराच वेळपासून डोकं घुसवून बसला आहेस त्यात!' तो म्हणला 'अरे समोरच्या वक्त्यांनी कोणी किती वेळा या ठिकाणी शब्द उच्चारला आहे त्याची आकडेवारी बनवतोय.' घ्या आता करून आपलाच कपाळ मोक्ष!

त्या भाषण शैली ची वैशिष्ट्ये अशी की सुरुवातीच्या चार ते पाच ओळीमध्ये एकदम खालच्या आवाजात अगदी रानातल्या म्हसोबा पासून सर्व देव देवता आणि नेहरू, गांधी, शिवरायांना वंदन केलं जातं. त्यानंतर असा काय मुद्द्याला ताडाखेबाज हात घातला जातो की त्या आवाजाने गर्दीत झोपी गेलेला सुद्धा ताडकन जागा होतो. आणि कित्येकदा आयोजकांना घाम फुटतो कारण ध्वनी प्रदूषण मर्यादा जर ओलांडली गेली तर आयोजकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता असते.

हे असे वक्ते जर दशक्रिया विधीला उपस्थित राहिले तर जमलेल्या शोकाकुल पाहुण्यांची करमणुकचं लय भारी. प्रत्येक दशक्रियेसाठी यांचं एकच भाषण ठरलेलं असतं. मग त्या व्यक्तीचं इतकं रंगवून रंगवून कौतुक चाललेलं असतं की त्या मयत व्यक्तीच्या भावकी मधील व्यक्ती मनातल्या मनात म्हणतो की उगाच राव याच्या सोबत बांधावरून वाद उकरून भांडत बसलो. किती देवमाणूस होता हा ते आज कळलं!

अशी ही भाषण शैली. या प्रकाराला "या ठिकाणी" अस नाव ठेवलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतु एक विशेष इथे नमूद करावं वाटतं की यातूनच पुढे जाऊन ग्रामीण भागातील लोक प्रभावी वक्ता बनून जातात. काळानुसार ते यात बदल करून आणि भाषणात नवीन गोष्टींचा समावेश करून सभा गाजवतात आणि गर्दीचं मन जिंकतात सुद्धा!

पंकज शिवाजीराव गायकवाड
https://Pankajsgaikwad.blogspot.com

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share

प्रतिक्रिया