Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतमालाच्या भावाची लढाई

" शेतीत राबताना आलेले अनुभव"......   
शेतमालाच्या भावाची लढाई                               
 
शेतकरी कुटुंबात जन्माला आलो १९७९साली मैट्रीकची परिक्षा देऊन नापास झालो.आणि शेती करायला लागलो..वडिल मोठे भाऊ शेतीत राबायचे त्यांच्या सोबतच शेतीची कामे करायचो त्याकाळी खळे करायचे म्हणजे १०-१२बैलाची मळणीची पाथ असायची हायब्रिड-ज्वारीचे खळे म्हणजे छोटेसे युद्धच.जमिन खोऱ्याने ओढून त्यावर सायंकाळी ४-५वाजता पाणी शिंपडायचे ते जमिनीवर थोडे वाहिले पाहिजे.मग ते रात्रभर ओलेचिंब भिजणार सकाळी दिवस निघाल्यावर बैलाची पाथ धरायची म्हणजे त्याला" खळखुरातणे "असे म्हणायचे ते साधारण दुपारी १२वाजेपर्यंत जमिन चोपडी,टणक बनवायची.हे टणक खळे जवळपास महिना २महिने कामी यायचे..त्यावर ज्वारी,तुर,मटकी,हुलगे.    
      कधीतरी गहू -हरभरा या खळ्यावर व्हायचा.
तसेच त्याकाळी शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवर मोट असायची.'चामड्याची मोट 'या मोटामध्ये साधारण १००लिटर पाणी वर यायचे मोटाला नाडा -सौंदड(सोल)२बैल सकाळी ५वाजता मोट गळ्यात घातली तर दुपारी २तास बैलांना आराम.चारा घालणे आणि पुन्हा मोट गळ्यात असे साधारण दिवसभराचे २०गुंठे (आर)क्षेत्र भिजवल्या जायचे .नांगरटी सुरु झाली की ६बैल मोठा नांगर,चार बैल नांगरी .ही नागरटी साधारण महिना २महिने चालायची अशी ही आमची ढोर मेहनतीची कामे करायचो.
      नेमके १९८०-८१मध्ये आम्ही इंजिन घेतले या इंजिनने मात्र ओलित चांगले व्हायचे त्याकाळात आमच्या बुलढाणा जिल्ह्यात साधारण ५%ओलित असावे.त्याकाळी नदीलाही पाणी विहिरीला पाणि असायचे.इंजिन तुरळक असल्यामुळ् त् आम्ही भाड्याने द्यायचो.ते बालगाडीत घालायचे .दुसऱ्या तिसऱ्या विहिरीवर न्यायचे.इंजिन उचलायचे .पाईप टाकायचे इ.साहित्य वाहून न्यावे लागत असे.नंतरच्या काळात १९८४पर्यंत फार बदल झाला.मोटाच्या ठिकाणी इंजिन .इंजिनच्या ठिकाणी विद्युत मोटार आली.बैलाची पाथ चालवणे .खळे करणे बंद झाले ,त्याठिकाणी मळणीयंत्र आले .बैलाची नांगरटी बंद होऊन ट्रैक्टर आले.हा बदल फक्त ५वर्षात झाला.
     आम्ही शेतामध्ये भाजीपाल्याचे पिके घेवु लागलो उसाचे पिकही घेवु लागलो पाणि दिल्यामुळे कापुसही भरपुर होऊ लागला.आमच्याकडे २५एकर शेती.आता मात्र राब- राब राबुन पिकं घ्यायचे याच काळात  विद्न्यान तंत्रद्न्यान आल्यामुळे आम्ही कपीशीचे सीड-प्लॉट (म्हणजे संकरित करणे).दोरा-पुंगळीचे सिडस् सकाळपासुन संध्याकाळपर्यंत अगदी गुंतुन महिला, मजूर इ.मिळून काळजीने काम करायचे मात्र उत्पादन फार कमी यायचे.त्या सिड-प्लॉटलाही भाव नाही.भाजीपाला भाड्याला पुरत नसे अशा स्थितीत आम्ही ऊस लावला.उसाला भाव ३००₹टन.बुलडाणा जिल्ह्यातील त्याकाळी एकमेव साखर कारखाना (जिजामाता सहकारी साखर कारखाना म.दुसरबीड) हा कारखाना मुर्दाड .ऊसाच्या टोळ्या पळवापळवी, ट्रक पळवापळवी.ऊसाचे गुऱ्हाळ सरकारी अधिकारी गुऱ्हाळावर येऊन इंजिन -चरख व इतर साहित्य जप्त करायचे.अशा प्रकारची दंडेलशाही.१९७८-७९ मध्ये ज्वारीची लेव्ही शेतकऱ्यावरील बँक कर्जासाठी शेतकऱ्याची भांडीकुंडी व टिनपत्र जप्तीची कारवाई करायचे.कापसाची एकाधिकार शाही .व्यापाऱ्यांना पुर्णपणे बंदी.कापूस उधार विकायचा.३टप्यात पैसे अशा प्रकारे शेतकरी सरकारकडून त्रासून सोडला असता मी तारुण्यात असतांना या जुलुम शाहीचा तिटकारा यायचा. ऑक्टोंबर १९८४साली बारडोली (गुजरात)ते टेहरे (महाराष्ट्र)मा.शरद जोशींनी महाराष्ट्रात प्रचारयात्रा काढली होती.
    सर्वच राजकिय पुढारी चाटबाज-हरामखोर शेतकऱ्याचं नाव घेवुन स्वार्थ साधणारे असा मनामध्ये जबरदस्त राग व न्यूनगंड.माझे मन या चळवळीकडे जाईना.परंतु मा.शरद जोशी यांची मराठवाड्यातून ही प्रचार यात्रा जालना -राजूर-भोकरदन जाणार आहे याची माहिती मला आमचे त्याकाळचे कै.श्रीरामबापू चव्हाण यांनी दिली.आमचे गांव मराठवाड्याला लागून अगदी १०कि.मी.अंतर कै.श्रीरामबापू चव्हाण काळेगांवचे त्यांची मुलगी आमच्या गांवात दिलेली असल्यामुळे त्यांचे जावई उद्धवराव देशमुख,सलिमखॉं पठाण व मी तेजराव मुंढे काळेगांवला शेतकरी संघटनेची सभा आहे म्हणून गेलो.रात्रीची सभा होती रात्री ९वाजता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेषराव मोहिते ,रमेश चिल्ले,हिम्मतराव बनकर हे वक्ते म्हणून होते.कै.श्रीरामबापू चव्हाण हे शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते.बापूंनी फार मेहनत घेवुन हा कार्यक्रम केला होता .           
         शेषराव मोहिते ,रमेश चिल्ले ,हिम्मतराव बनकर आणि आयोजक कै.श्रीरामबापू चव्हाण यांनी शेतकऱ्यावर होणारे अन्याय, शेतीचा धंदा तोट्यात शेतमालाचा रास्त भाव व मा.शरद जोशी यांनी परदेशातील नोकरी सोडून स्वत:च्या घरावर ठेवलेले तुळशीपत्र, आय एस आय झालेला माणूस स्वित्झर्लँड मधील गडगंज पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्याचं नेतृत्व करतो.व सरकार विरुद्ध या माणसानं बंड पुकारलं .लढा उभारला.शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव,शेतकऱ्याची कर्जमुक्ती इ.विषयावर या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.   
   बारडोली ते टेहरे ही प्रचारयात्रा चालु होती आणि ३१ऑक्टोबर १९८४ रोजी प्रचंड जाहिर सभा होऊन समारोप होणार आहे आणि शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकल्या जाणार आहे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमासाठी जाण्याची तयारी केली आणि आम्ही या कार्यक्रमाला गेलो.शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला छातीवर लावला .टेहऱ्यातील सभेसाठी शेकडो वाहने या प्रचार यात्रेत सामिल झाले.
          आणि सभास्थळी सकाळी १०वा पोहचलो तम उन्हात शेतकरी बसत होते लाखो शेतकरी प्रथमच डोळ्यांनी पाहिले.डोळ्याचे पारणे फिटले.सभेला सुरुवात होणार ११वाजता लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली .काहीच समजत नव्हते.१२वाजता शेतकरी संघटनेचे नेते सर्वश्री मा.अनिल अण्णा गोटे,मा.विजय जावंधिया,रामचंद्र बापू पाटिल,माधवराव मोरे व मा.शरद जोशी यांचे आगमन झाले.२-३नेत्यांची त्रोटक भाषणे झाली.मा.शरद जोशी साहेब भाषणासाठी उभे राहिले..माझ्या आयुष्यात मी शरद जोशी प्रथमच पाहिले.डोळ्याचे पारणे फिटले.साहेब पाहिले आणि विश्वस्वरुप पाहिल्याचा भास झाला.ज्या माणसाने एवढा समाज जमवला.शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा ऊभारला.मी मनोमन धन्य झालो होतो पण अघटित घडले एवढे परिश्रम घेवुन साहेबांनी जमवलेला लाखो समाज होऊ घातलेलं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबलं.या देशाच्या पंतप्रधानाची दिवसाढवळ्या गोळ्या घालुन हत्या झाल्याचं जाहिर झालं...आणि या मेळाव्यात शेतकऱी आंदोलनाची घोषणा होणार पण देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे श्रीमती इंदिरा गांधीना श्रद्धांजली आम्हाला वाहावी लागली .
   आता मी शेतकरी संघटनेचा पुर्णवेळ कार्यकर्ता झालो होतो.शेतकरी संघटनेची अनेक पुस्तके वाचली.शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव, शेतकरी कर्जमुक्ती,महिलांचे प्रश्न इ.विषयावर आम्ही शेतकरी संघटनेचं रान पेटवण्यास सुरुवात केली.माझ्या सोबतच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कै.फुलचंद कोटेचा,बबनरीव चेके,अहमदखॉं पठाण ,उत्तमराव गिते इ.कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातून आणलेला वणवा पेटवण्याचे काम सुरु केले.तिकडून बुलडाणा जिल्ह्याची शेतकरी संघटनेची तोफ कै.किसनराव शेवाळे गुरुजी,कै.शंकर महाराज घुबे ,एकनाथ पाटिल थुट्टे,वामनराव जाधव इ.कार्यकर्त्यांनी शेतमालाच्या भावाची लढाई केली विविध आंदोलने केली तुरुंगवास भोगला.शरद जोशी यांनी आम्हाला वाघाचे डोळे दिले.डोळ्यात डोळे घालण्याची ताकद दिली.शेतीचा धंदा तोट्यात चालतो याचं गमक समजलं.आम्ही जिवंत असेपर्यंत शेतमालाच्या भावाची आमची लढाई चालूच राहणार आहे.आमच्यावर एवढा पगडा संघटनेचा पडला की मुलाचं नावही शरदच ठेवलं.  
      झाशीच्या राणीने १८५७साली उठाव केला या लढ्यात पाहिजे त्या प्रमाणात जनतेने सहकार्य न केल्यामुळे १००वर्ष देशाचं स्वातंत्र्य लांबलं.तसेच मा.शरद जोशींनी पुकारलेल्या लढ्यात शेतकऱ्यानी पाहिजे त्या प्रमाणात सामिल न झाल्यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करतो आहे.देशात २७०शेतकऱ्यांच्या संघटना झाल्या.युगात्मा शरद जोशी गेले शेतकऱ्याचं स्वातंत्र्य १००वर्ष लांबलं हे मान्य करावे लागले हे अनुभवाचे बोल!

- श्री तेजराव मुंढे
देऊळगांव राजा तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना,
विदर्भ राज्य आंदोलन समिती बुलडाणा जिल्हा समन्वयक

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
चळवळीतील अनुभव
Share

प्रतिक्रिया