Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मंडूळ्या

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
कथा

मंडूळ्या

आजची सकाळ तशी उत्साही वाटत होती. एकूण सगळ्याच वातावरणात उत्साह आणि चैतन्य आल्यासारखे वाटत होते. राम आबाच्या घरात आनंदी आनंद आहे असे दृश्य दिसत होते. घरातली लेकरं आणि दारातली कोकरं आनंदाने उड्या मारत असली की समजावं घरात सगळं कुशल मंगल आहे. असं राम आबाचं तत्त्वज्ञान होतं. आणि घरात आज तसंच वातावरण दिसत होतं.
घरातली लेकरं आनंदी होती. आज काहीतरी वेगळं घडतंय असं त्यांना वाटत होतं. कारण बऱ्याच दिवसांतून आबा काल बाजारला गेले होते आणि बऱ्याच दिवसांतून पिशवी भरून वाण−सामान घरात आले होते. आबाला तीन मुले. त्यापैकी दोन मुली आणि एक मुलगा. एका मुलीचे लग्न झाले होते. घरात आता ही दोन मुले आबा, आबाची पत्नी पार्वती आणि आबाचे म्हातारे आईवडील असा परिवार होता. आबाची शेती दोन एकरच होती. त्यात एवढ्या सगळ्या कुटुंबाला पोसणे म्हणजे आबाच्या नाकी नऊ येत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला आनंद तसा कमी कमीच येत होता .
आज सकाळी सकाळीच किश्या म्हणजे आबाचा मुलगा नेहमीपेक्षा लवकरच उठला. राखुंडीनं कसंतरी दात घासलं आणि बाहेरच्या पाण्यानं तोंड धुतलं. आई आतनं ओरडत होती.
“किश्या, उन पाणी घे की, त्वांड धुयाला.”
पण त्याला गडबड होती. त्याच गडबडीत आत येऊन आजीच्या अंगावर असलेल्या पातळाला तोंड पुसलं. तेवढ्यात आजी खेकसली.
“किश्या मुडद्या, टावेल बिवेल घे की. माझंच पाताळ दिसतंय होय तुला.”
तेवढ्यात शीतल सगळं पारोस लोटत होती. ती म्हणाली, “आगं आजे, त्याला तुझं जुनेरच टॉवेलपेक्षा मऊ मऊ भारी वाटतंय बघ. पुसू दे. पुसू दे.”
“आगं पण, मी मेल्यावर कशानं पुसंल? माझं काय? आता दहा गेलं अन् पाच उरलं. मी पिकलं पान, कवापन गळून पडल.”
किश्या म्हणाला, "आगं पण, तुझी पातळं असणारच की. तू गेलीस तरी ती मी जपून ठेवीन.”
त्यांनं आईकडे बघितलं आणि म्हणाला, "काल आबानी पिशवी भरून बाजार आणलाय. मला त्यातला गऱ्याचा चांगला साखरतला शिरा करून दे की."
"आरं किश्या, साखर परवडत न्हाय. त्यापेक्षा गुळातला करू का?"
"नको."
आबा पण चहा घ्यायसाठी आत आले आणि म्हणाले, "अगं दे त्याला साखरतला शिरा करून. आता काहीही अडचण नाही आपल्याला. आता लवकरच आपली काटकसर संपल."
तेवढ्यात आबाचं वडील आण्णा म्हणाले, "रामा मागच्या टायमाला शेतात हळद आणि मका केला. तवा आपून असंच म्हणालो होतो. आता पैसा इल वाटलं होतं. पण झालं उलटंच. दर आला नाय आणि कर्ज पण फिटलं नाय. आता पैसा हातात येईपर्यंत उगाच उधळपट्टी नको. यिल तवा बघू."
"असूद्या, आण्णा."
"आरं पण, शीतलचं लग्न पण करायचं हाय. त्याला पण पैसे लागत्यातच की."
"बघू, करायला यील काय तर."
शीतल मध्येच म्हणाली, "आबा मला लगीन नाय करायचं. मला शिकायचं हाय आणि आक्काच्या लग्नाचं कर्ज अजून फिटता फिटत नाय आणि त्यात माझी भर नको."
पार्वती म्हणाली, "शीतले, पोरगी म्हणजे आई बापाच्या जीवाला घोर. तिला घरात ठेवून कसं चालंल. ऐपत नाही म्हणून लेकीचं लगीन थांबवून चालतं का? कसं तरी हात पिवळं केलंच पाहिजेत तुझं आम्हाला."
"अगं पण अजून किश्याचं शिक्षण पण हायच की."
"असू दे. तू नको चिंता करूस. फक्त तुला जमल तेवढं शिकवू. नाय जमत त्या दिवशी लगीन करून टाकू. "
"काय गं आई, तू पण."
"होय बाई. तुला नाय कळायचं, जाऊ दे. आवर. गरा चाळ. किश्याला शिरा खायाचा हाय."
शीतल म्हणाली, "किश्या, तुझ्या परीक्षेचं रं काय केलंस ? आबाला सांगितलं नायस ते?"
"आग तायडे, या माझ्या आजीनं येरंड्या ठेवल्यावत्या. त्या कालच दुपारी शाळेतनं आलो आणि बाजारात विकल्या. जे पैसे आले त्यांची फी भरली आणि उरलेलं तुझ्या पुस्तकांसाठी पण ठेवल्याती. आता तू तेरावीला हायस. तुला पुस्तकं लागल्यातीच की."
"किश्या लय मोठा झालायस रं."
"होय तायडे. मी अजून मोठा झालो की नोकरी करणार हाय बघ. आबाला शेतात जावंच लागणार नाही. घरात रोज साखरंचा शिरा करून खाणार आणि सगळ्यास्नीच कापडं घेणार."
"होय किश्या. खा, खा. लय मोठा हो बघ. सगळं दारिद्र्य संपवून टाक.”
तेवढ्यात आबा म्हणाले, "तू मोठा झाल्यावर कशाला? आता आपलं सोयाबीन तरारून आलंया. ते गेल्यावरच घेऊया की सगळ्यास्नीच कापडं."
किश्या म्हणाला, "मला जिन्स घ्यायची बरं का?"
"बरं बरं चला आता. तेवढा शिरा खावा आणि शाळेच्या टायमापर्यंत तेवढं तू, मी आणि शीतल मिळून सोयाबीनच्या रानात भांगलून चार पातीचं तन काढूया. चला."
शीतल रडवेल्या सुरात म्हणाली, "आबा आज माझा पेपर हाय. मला जरा तरी अभ्यास करू द्या की. परत कॉलेजला लवकर जायचं हाय."
"आता माझी पण परीक्षा हाय. मी पण न्हाय येणार." किश्यानं मागणं सूर ओढला.
पार्वती रागानं म्हणाली, "किश्या, शीतल आरं पैसा काय आभाळातनं पडतुया काय रं? इथं आम्हाला दोघांना रात्रंदिवस रक्त आटवायला लागतंय. खाणारी तोंडं एवढी. या म्हाताऱ्यांना काम होत नाय. तुमचं हे असं. मग करायचं कुणी रं? जरा समजून घ्या बाळांनो."
आबापण समजुतीच्या सुरात म्हणाले, "पोरांनो, सोयाबीन चांगला आलाय. आता पैसा चांगला हुईल; म्हणून त्या आशेवर काल पिशवीभर माल आणला. पण आता त्या सोयाबीनला जपलं पण पाहिजे. नाहीतर तनच सगळं पीक खाऊन टाकंल. मग परत जगायचं कसं? आता रोजगारी पण मिळणासं झाल्याती."
"पण, आबा समजून घ्या की. परत उशीर झाला की शाळेत मार खावा लागतूय", किश्या म्हणाला.
"होय. आता आजच्या दिवस राहू द्या की शेतात जायचं", शीतल पण मागं सूर ओरडत म्हणाली.
आबा म्हणाले, "बरं पोरांनो, जावा. तुमच्या शाळेचं आमाला काय कळतंय?"
आज पेपर असल्यामुळे शीतलने आजी-आजोबांचा आशिर्वाद घेतला. आई-बाबांचा आशिर्वाद घ्यायला खाली वाकली. आईनं तिला आशिर्वाद द्यायला पाठीवरीनं हात फिरवला; तर ड्रेस ओलाच होता. आई म्हणाली,
"शीतल, ड्रेस वल्लाच हाय गं."
"नाही गं. कपडे धुताना भिजला आसंल."
"आगं, पण मागणं कसा भिजला?"
"कुणास ठाऊक?"
"आगं पोरे, वाळलाच न्हाय ड्रेस."
"होय, पण..... "
"पण काय?"
"आगं दुसरा ड्रेस कुठं हाय घालायला?
आबा आणि पार्वतीच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं. आबा म्हणालं,
"म्हणजे पोरी रोजच तू अशी जात असणार, आम्हाला सांगायचंस तरी.”
"पण आबा सांगून काय करायचं? तुम्ही स्वतः वर्षानुवर्ष एका ड्रेसवर दिवस काढताय. आईला चांगली एकच साडी असते. बाकीच्या बायका भावकीच्या लग्नकार्यात चांगल्या साड्या नेसून येतात. तेव्हा तिच्या नजरेतली घालमेल मी कितीतरी वेळा बघितली हाय. बिना दागिन्यांचा गळा झाकण्यात चाललेली कसरत या डोळ्यांनी नेहमी बघतेय. किश्याच्या कपड्यांची ठिगळं बघितली की आपोआप डोळ्यात पाणी येतं. घरातल्या सगळ्यांचीच अशी अवस्था आहे. मग तुम्ही कुणाकुणाला कपडे घेणार. आता तुम्ही काय मुद्दाम करताय का? मी आता मोठी झालीय आबा. त्यामुळे तुम्हाला किती त्रास द्यावा हे मला कळतं. म्हणून तुम्हाला सांगितलं न्हाय."
"आगं, पण तुला त्रास हुतुया, त्याचं काय?"
"आबा माझं बरंच म्हणायचं. निदान एका ड्रेसवर का होईना पण मला शाळा शिकायला तरी मिळते. पण गावातल्या बाकीच्या पोरींना ते पण मिळत न्हाय. म्हणून यातच समाधान हाय."
असं म्हणून शीतल तशीच कॉलेजला पळाली. किश्यापण तिच्या सोबतच बाहेर पडला. किश्याच्या पँटला दोन ठिगळं लावलेली होती. दोघही पाठमोरी होताच पोरांचा तो अवतार बघून आबा आणि पार्वती दोघपण रडायला लागले. आबा मटदिशी खाली बसले आणि बायकोला म्हणाले,
"कधी आपलं सगळं चांगलं व्हायचं? पोरांचं हाल बघवत न्हाय बघ."
"असू दे. रडू नका. रडून काही फायदा नाही. आपल्या नशिबात आसलं म्हणायचं. त्याला आता काय करायचं. आता सोयाबीन गेल्यावर जरा चांगलं दिवस येतील."
"बघू या."
आजचा दिवस तसा आनंदात गेला. आता रोजच आनंद असायचा. जगण तेच होतं, पण भविष्य सुखात दिसत होतं. रानातला टरारुन आलेला सोयाबीन हसवत होता. उद्या घरात सुख येणार आहे असा सतत खुणावत होता. दारिद्र्य आजही होतं. काटकसर अजूनही चालूच होती. ओढाताण आजही होतच होती. पण भविष्याची चिंता मिटणार म्हणून सगळं वातावरणच आनंदी, उत्साही झालं होतं.
असे बरेच दिवस आनंदात गेले. आबा सोयाबीनला जिवापेक्षाही जास्त जपत होतं. तसं सगळ्या गावातच आनंदी वातावरण होतं. कारण यावर्षी निसर्ग प्रसन्न होता. शिवार धन-धान्यानं फुललं होतं. सगळेच जण भविष्याची स्वप्ने रंगवत होते आणि दिवसामागून दिवस जात होते. धन-धान्य, सोयाबीन आता काढणीला आलं होतं. पंधरा-वीस दिवसांत काढणी होणार होती. लोकं त्या तयारीला लागली होती. मात्र एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी आबाच्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळी सकाळीच आभाळ काळवंडलं हुतं. उठल्यापासूनच घरात कुणालाच करमेना.
पार्वती म्हणाली, "आज काय बरं वाटना बाई. मनाला सारखी हुरहुर लागलीया."
सासू म्हणाली, "तुझं आपलं काहीतरीच असतं. हुतं कधी कधी असं. काय होत न्हाय. काळजी करू नगंस."
आज आभाळानं चांगलाच फेर धरला होता. सकाळपासून उकडत होतं, गुदमरत होतं. आबाचा जीव कासावीस झाला. आबाला चैन पडेना. तेवढ्यात दुपारी अचानक गार वारा सुटला. आबाला दुपारचं जेवण घशातनं खाली उतरना. त्या गार वाऱ्यातसुद्धा आबाला दरदरून घाम सूटला. आता पाऊस येणार हे नक्की झालं. आता हातात आलेलं पीक पावसात भिजलं तर कसं होईल या भीतीनं सगळा शेतकरी वर्गच गारठला.
दुपारनंतर अचानकच कोरड्या जमिनीवर तुरळक थेंब पडले. वाटलं, तेवढ्यावरच पाऊस थांबेल. पण तसं झालंच नाही. थोड्या वेळातच धो-धो पाऊस पडायला लागला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात महापूर दाटला. आता काय करायचं काही कळेना. सगळे हताश झाले.
पाऊस सुरू झाल्यावर आबा मटकन खाली बसलं. घरात सगळे डोक्याला हात लावून बसले. पोरांचा आता सगळा उत्साह मावळला. त्यांच्या डोळ्यापुढे तीच जुनी कपडे दिसायला लागली. पार्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला नवऱ्याची काळजी वाटायला लागली. आता पावसानं चांगलाच जोर धरला. तीन दिवस झाले तरी पावसाची रिपरिप काही थांबेना. आबांचा धीर सुटत चालला होता. सगळं लक्ष शेताकडं लागलं होतं. शेताकडं सारख्या येरझाऱ्या चालल्या होत्या. अखेर तीन दिवसांनंतर पाऊस थांबला आणि आबाने शेताकडे धाव घेतली. शेतात पाय ठेवण्यासारखी स्थिती नव्हती. सगळा सोयाबीन पाण्यात कुजायला लागला होता. काळा पडला होता. आबा हताश होऊन घराकडं परतलं. पार्वतीनं ते बघितलं. ती जवळ गेली. समजावलं. शीतल पण बापाच्या जवळ जाऊन बसली आणि बापाला म्हणाली,
"आबा घाबरू नका. होऊ दे काय व्हायचं ते. आपण जगू कसं तरी. काळजी करू नका."
शीतलच्या एवढ्या बोलण्यानं आबाला धीर आला. आबा म्हणाले, "पोरगी लयच मोठी झाली. बापाला धीर द्यायला लागली बाबा. शीतल, आगं तुझं बरोबर आहे. नाही काळजी करत. जगू कसं तरी."
आता सगळ्यांनाच धीर आला; पण भविष्याची काळजी होतीच. ती काही संपत नव्हती. पार्वतीला नवऱ्याची काळजी वाटतच होती. खुंटीवर कासरा दिसंना, कि ही पोरांना बापाला शोधायला पाठवायची. असा रोजचा दिवस जात होता. हळूहळू सगळेच सावरले. तेवढ्यात गावातल्या एका कर्त्या शेतकऱ्यांनं म्हणजे शीतलच्या मैत्रिणीच्या बापानं एके दिवशी आत्महत्या केली. कारण असे होते, की शीतलच्या मैत्रिणीचं - संगीताचं, पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नात तिच्या सासरच्यांनी मोठा हुंडा घेतला. तिच्या बापाला ते कर्ज फिटता फिटेना. शेवटी त्यांनी वैतागून झाडाला गळफास लावून घेतला. त्यांच्या घराचा वनवास सुरू झाला. शीतलच्या मनावर त्या गोष्टीचा फार मोठा परिणाम झाला. तिला तिच्या आबाची काळजी वाटायला लागली.
शीतल लग्नाला आली होती. स्थळं पण यायला लागली. आबानी पण विचार केला, शेतकऱ्याच्या पोरीला शिकून-शिकून किती शिकता येईल? सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. त्यापेक्षा आपलं चांगलं स्थळ आलं की तिचं लग्न करून टाकू. निदान ती सुखी तरी होईल.
आतापर्यंत आलेल्या स्थळांमध्ये दोन-चार स्थळं चांगली होती; पण त्यांच्या हुंड्याच्या अपेक्षा फार मोठ्या होत्या. एवढं ओझं आबाला पेलवणार नव्हतं आणि त्यासाठी घरादाराची होणारी फरपट शीतलला बघवणारही नव्हती. त्यामुळे तीसुद्धा यासाठी तयार होत नव्हती.
स्थळं बघा-बघी होत होती. पसंत पडलेली स्थळं पेलणारी नव्हती. आता काय तो निर्णय घ्यायलाच पाहिजे. शीतलच्या लग्नासाठी भले थोडं रान विकायला लागलं तरी चालेल; पण थोड्यासाठी चांगली स्थळं हातची जायला नकोत, असा आबाचा विचार चालला होता. इतक्यात आज एक स्थळ आलं. मुलगा देखणा होता. शहरात नोकरीला होता. सगळ्यांनाच पसंत पडलं. त्यांनाही शीतल पसंत पडली. देण्याघेण्याची चर्चा झाली आणि आबांनी गुपचूप जरा ऐपतीपेक्षा जास्तच देण मान्य केलं आणि लग्न ठरलं. आबांनी हात जोडलं आणि पाहुण्यांना सांगितलं,
"पावनं मी फाटका माणूस हाय; पण माझं लेकरू सुखात रहावं म्हणून एवढी वढातान करतुया. काय कमी-जास्त समजून घ्या आणि माझं लेकरू तेवढं सुखात ठेवा.”
पाहुण्यांनीपण शीतलला सुखात ठेवण्याचं आश्वासन दिलं.
आता शीतल तशी आनंदात होती पण तिच्या मनात एक धाकधूक होती. जसं संगीताच्या वडिलांनी करून घेतलं तसं माझ्या लग्नानंतर आबानी केलं तर काय करायचं? पण तिचा बाप तिला म्हणायचा, "माझ्या लेकराला मला मंडूळ्यात बघायचं हाय." म्हणून ती लग्नाला तयार होती; पण एक दिवस तिला या देण्या-घेण्याची बातमी कुठून तरी कळाली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आबाला सांगितलं, “मला लग्न करायचं न्हाय.” पण त्यांनी ऐकलं नाही. तिला फक्त आबांचा केविलवाणा चेहरा आणि गळफास एवढंच दिसत होतं. आपल्यामुळे सगळंच उद्ध्वस्त व्हायला नको; म्हणून तिनं एक विचार केला आणि मन घट्ट केलं.
नेहमीप्रमाणे सगळे रानात गेले होते. सायंकाळी घरी आले तर शीतलचा निर्जीव देह तुळईला लटकत होता. आईने शीतलला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातलं आभाळ रितं करायला लागली. इकडे आबाचा देह निष्प्राण झाल्यासारखा झाला होता. किश्या हंबरडा फोडून रडत होता. आजी-आजोबा तर गळूनच गेले. सगळ्या घरादारालाच धक्का बसला. शीतलने घरातच तुळईला ओढणीने गळफास लावून घेतला होता. शीतलचे प्रेत खाली उतरले; तर तिच्या कपाळाला मंडूळ्या होत्या. हातात एक चिठ्ठी होती आणि त्यात लिहिले होते.
"प्रिय आबा आणि आई,
मला माफ करा. मी तुम्हाला सोडून जात आहे; पण मला हा निर्णय घ्यावा लागला. तुम्ही कुणीच माझं ऐकत नव्हता. आणि मला माझ्या बापाची गत, संगीताच्या बापासारखी झालेली बघायची नव्हती. सगळ्या घरादाराचं हाल झालं असतं. किश्याच्या कपड्यांवर आणखी चार ठिगळं आली असती; म्हणून मी हा निर्णय घेतला. माझ्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. आबा तुमची इच्छा होती, माझ्या कपाळाला मंडूळ्या बघायची. तर त्या मी बांधल्या आहेत. या रूपात मला बघून घ्या. या जगात एका शेतकऱ्याला आणि त्याच्या पोरांना यापेक्षा मोठी सपनं बघायचा काहीच अधिकार नाही; म्हणून मी हे जग सोडून जात आहे. मला माफ करा. माझी आठवण म्हणून या मंडूळ्या मात्र जपून ठेवा. तुमचीच शीतल."
आबांनी त्या मंडूळ्या हातात घेतल्या आणि माझ्या लेकराच्या मंडूळ्या म्हणून छातीशी कवटाळून रडायला लागले. आता फक्त त्या निर्जीव मंडूळ्या हातात राहिल्या होत्या, फक्त निर्जीव मंडूळ्या …..!

सौ. अर्चना सुनील लाड
पलूस, जि. सांगली
मोबाइल - ७४४७५६०५७८

Share

प्रतिक्रिया