नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

टाहो

विजय शेंडगे's picture
लेखनप्रकार: 
गद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
ललितलेख

गावाहून रविवारीच आलो होतो. पण दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्यामुळे लिहिण्याचा मूड नव्हता. दिवसातून चार चार वेळा उदास चेहऱ्यानं आभाळाकडं पहायचो. आणखी निराश व्हायचो. आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल या आशेवरच दिवस ढकलतो आहे.

कुणीतरी म्हणलं होतं ," एकादशीला नक्की पाऊस पडणार आहे." हाही एक आशावादच. पण आज सकाळपासून मोकळं आभाळ आणि लख्खं उन पाहून अधिक निराश झालो. हवामान खात्याच्या अंदाजांवरचा माझा विश्वास उडाला असला तरी परमेश्वराच्या अस्तित्वावारची श्रद्धा ढळलेली नाही.

तो निराश करणार नाही. जर चोच देणारा तोच असेल तर..... तोच दाणा का देणार नाही ?........ जर तहान देणारा तोच असेल तर..... तोच पाणी का देणार नाही ? पुण्यवंत अशा सीतेलाही अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. दानशूर अशा बळीराजालाही मातीआड व्हावं लागलं. कृष्णाला जन्म देणाऱ्या देवकीलाही तुरुंगवास भोगावा लागला. प्रत्यक्ष श्रीरामालाही वनवास चुकला नाही. आपण तर पापाचे धनी. आपल्याला थोडंतरी भोगायलाच हवं ना ?

पण भोगायचं म्हणजे किती ! आई खूप कामात आहे म्हणून दुधासाठी टाहो फोडणाऱ्या आपल्या तहान्याला ती काही काळ रडू देईल. पण त्यापेक्षा फार काळ नाही ना ? मग आम्ही ज्या विठूची लेकरे त्या विठूलाच आमचा कळवळा कसा येत नाही ? देवाला काही मागू नये. त्याला सारं कळत असतं. वेळ आली कि तो प्रत्येकाच्या झोळीत त्याचं त्याचं दान टाकत असतो. पण कधी ? आणि आज एक दोन नव्हे हजारो लाखो जीव पाण्यासाठी टाहो फोडताहेत. आणि तरी या विठूरायाला पाझर फुटत नाही.

परवा गावाकडे कैक उन्हाळे पावसाळे पाहिलेली खूप सुरकुतलेली माळ्याच्या शिंद्याची नानी म्हणाली, " पाऊस पडणार हाय पोरा. पण तो तुमच्यासाठी नाही तर मुक्यासाठी." या गोष्टीलाही आज पंधरा दिवस होत आले. पण पावसाचा पत्ता नाही.

विहिरींनी तळ गाठलाय. ओढ्याला चार-सहा मैलांच्या परिसरात कुठेही पाणी उरलेलं नाही. ओढ्यातल्या एकदोन खड्यात कुठंतरी गुढघाभर पाणी असतं. पण तेही पाझर आटलेलं. साठलेलं. मेलेलं. हिरवंगार पडलेलं. गाया-गुरं.......शेरडा-मेंढर येतात. त्या हिरवटलेल्या पाण्याभोवती घुटमळतात. पाणी असून पिता येत नाही म्हणून केविलवाण्या नजरेने त्या वास मारणाऱ्या पाण्याकडं पहातात. उदास होऊन पाण्याच्या काठाशी बसून रहातात. थोड्यावेळाने उठून पुन्हा ओढ्यातल्या टीचभर गवताशी तोंड घासत रहातात.

चाळीस पन्नास मेंढर घेऊन ओढ्या काठानं फिरणारा ऐन्शीचा खराताचा म्हतारा मला म्हणत होतं," साहेब कधी पडायचा पाऊस ? कशी जगवायची मेंढर ?"
" आता काय करणार मामा ? पाऊस काय आपल्या हातात आहे का ? " मी.
" न्हाई हे मस खरं हाय. पण या मुक्या जीत्राबांच करायचं काय. धड जगवता हि येईनात आन मारताही येईनात."
" आपला जीव त्यांच्यात गुतलेला आणि त्यांचा आपल्यात. मारता कशी येतील मामा. येईल पाऊस. आपल्या पेक्षा त्यालाच जास्त काळजी आहे." मी आभाळाकडं पहात म्हणालो.
" पडू दे सोन्या माझ्या. हे वरीस जाऊ दे कसबी. पण तुला सांगतो पुढल्या साली तुझ्या विहिरीच्या कडंला जनवारांसाठी एखादा पाणवठा बांध." ओढ्याकाठी असलेल्या माझ्या विहिरीला अजूनही तासभर पाणी असतं हे बघून म्हतारा सांगतो.
" माझं थोडं बस्तान बसू द्या. मी नक्की पाणवठा बांधीन." म्हाताऱ्याची सूचना मला आवडलेली असते. चला या मार्गानं थोडसका होईना पण पुण्य गाठीला बांधता येईल. म्हणून मीही पुढल्या उन्हाळ्यात पाणवठा बांधायचा मनोमन निश्चय करतो.

दुपारी मी बाभळीखाली कलंडलेलो असतो. उन्हाची लाही लाही उडालेली असते. बाभळीच्या फाद्द्यांमधील गारव्यात केक्यांचा ( एक पक्षी) किलकिलाट चाललेला असतो. मला प्रश्न पडतो. हि पाखरं कुठ जात असतील पाणी प्यायला.

कुठल्याच पानथळीला पिण्यासाठी पाणी उरलेलं नाही. हि अवस्था किती भयानक आहे याचं हे आणखी एक उदाहरण-
दुपारच्या भाकरी खायच्या होत्या. वीजपंप चालू करायला वीज नव्हती. प्यायला पाणी आणायचं होतं. पाण्यासाठी मी आणि माझा गडी हंडा घेवून विरहीवर गेलो. विहीर आखीव रेखीव. बांधलेली. दगडांची. पायऱ्या असलेली. पाणी पार तळाशी. पायरयांपासून पुरुषभर खाली. तळापासून गुढगाभर वरती. आम्ही विहिरीच्या तळाकडे पहात पायऱ्यांवरून विहिरीत उतरू लागलो. आणि तळाशी दिसलेलं दृश्य पाहून अचंबित झालो -
एक साप कपारीच्या आधारे विहिरीत उतरला होता. आणि कपारीच्या आधाराने पाण्याशी तोंड नेऊन पाणी पीत होता.

सापाला पाणी लागतं चमचाभर. पण कुठल्याही पानथळीला आज तेवढंही पाणी उरलेलं नाही.
आणि तरीही विठू डोळे मिटून गप्पं आहे. आज त्याच्या दारात त्याच्याच नामस्मरणात तल्लीन झालेला प्रत्येक वारकरी फक्त पावसाचीच याचना करत असेल. आता तरी विठूला पाझर फुटावा.

G2शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share

प्रतिक्रिया