Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

              "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट "पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल," असा आकाशवाणी/दुरदर्वशनर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे, अशी स्थिती आहे.

             एकदा तर "पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले - शेतकरी चिंताग्रस्त" असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

           आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

       कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या  संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीपुरता हवामान शास्त्रज्ञच असतो. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो असे त्याने वर्नुषावर्षे अनुभवातून हवामानाचे दर्शन घेतलेले, त्यामुळे त्याचा या बाबीवर विश्वास असतो. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधिक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

        हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

        पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:

१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
---------------------
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
---------------------
३) foreca
http://www.foreca.com
-------------------
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
------------------
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
-----------------------
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
-----------------------
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
-------------------------------
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
--------------------------------
९) Accuweather
https://www.accuweather.com/en/in/india-weather
--------------------------------
१०) Skymetweather
https://www.skymetweather.com
--------------------------------

        यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असतात. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.

         या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास "शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस" असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. "पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे" हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशाचाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत? एवढा तरी विचार करायला आपण शिकणार आहोत की नाही?
            मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
        हवामानशास्त्राच्या बाबतीत आपण इतर देशांपेक्षा शेकडो वर्षांनी मागे आहोत, हे दिसतेच आहे. हरकत नाही पण; इतर देशांच्या पुढे जाण्याचा, बरोबरी करण्याचा किंवा महाशक्ती बनण्याचा मुद्दाही सोडा, शेतीला थोडाफ़ार हातभार लागेल  एवढे तरी हवामानशास्त्र विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि वेळोवेळी निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतीविषयात नको तेव्हा, नको ती लुडबुड करणारी विद्वान मंडळी काही हातपाय हालवणार आहेत की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे.

      स्वातंत्र्योत्तर भारतातील शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि पुस्तकी ज्ञानाच्या महामेरू विद्वान मंडळींना स्वातंत्र्याचे हवामान मानवणार नाही, याचा अदमास जर महात्मा गांधींना जर तेव्हा आला असता तर त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला असता किंवा नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

( क्रमश: )

   - गंगाधर मुटे
दिनांक : २२-०७-२०११

----------------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 15/06/2014 - 17:18. वाजता प्रकाशित केले.

    ३ वर्षापूर्वी पहिला भाग लिहिला.
    पुढील भाग लिहायचे बाकी राहीले. आता ही लेखमाला पूर्ण करावी लागेल.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 20/06/2014 - 22:12. वाजता प्रकाशित केले.

    काही सेकंदापूर्वी माझ्या मोबाईलवर (Free SMS) खालीलप्रमाणे SMS आला. या SMS ची शेतीसाठी उपयोगिता काय? त्यांचे पगार सुनिश्चित होण्यापलिकडे काय अर्थ आहे या SMS ला?
    शेतीसाठी आम्हाला पाऊस येणार किंवा नाही याविषयीची माहिती हवी असते. तापमान आणि आर्द्रतेच्या आकडेवारीचे काय करायचे?
    ---------------------
    वर्धा जिल्‍हयामध्‍ये दि. २५ जून पर्यंत आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३६.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २९.० अंश सेल्सिअस राहील. हवेतील आर्द्रता सकाळी ७५ ते ८० टक्‍के आणि दुपारी ३८ ते ४२ टक्‍के राहील.
    :: Director, Agriculture Meteorology, PUNE
    ----------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 22/07/2014 - 15:52. वाजता प्रकाशित केले.
                      गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा'मान' खात्याला 'मान' खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्‍यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.

                      बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्‍यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.

                      पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्‍याला कवडीचाही उपयोग नसतो.

                      पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे?

    आणि म्हणूनच

    हवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.

                                                                                                                        - गंगाधर मुटे
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!